गेल्यावर्षी शिवसेना पक्षात बंडखोरी झाली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत भाजपाला पाठिंबा दिला होता. तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार हे निधी देत नाहीत. म्हणून आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो, असा दावा शिंदे गटातील नेत्यांनी केला होता. यानंतर आता अजित पवार स्वत: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे शिंदे गट ज्या नेत्याच्या जाचामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडला आता तेच नेते (अजित पवार) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आले आहेत. यामुळे शिंदे गटाच्या आमदारांची आणि कार्यकर्त्यांची कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संवाद साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार हे शिंदे-भाजपा सरकारमध्ये येतील, असं अपेक्षित नव्हतं पण तुम्ही त्यांना सामावून घेतलं. आता पुढे संसार कसा करायचा? असा प्रश्न विचारला असता संजय शिरसाट म्हणाले, “मुळात आम्हाला बहुमताची गरज नव्हती. मग अजितदादांना का घेतलं? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. आमच्याकडे १७२ आमदार असताना पुन्हा त्यांना (अजित पवार) घ्यायची गरज काय? परंतु राजकारणात काही समीकरणं बसवावी लागतात. मग येणारी विधानसभा असो वा लोकसभा असो…”

हेही वाचा- “महाराष्ट्राची राजकीय संस्कृती चिखलात…”, रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत, रोख कुणाकडे?

“प्रत्येक माणसाची एक ताकद असते. पक्षाची ताकद तर असतेच पण वैयक्तिक नेत्याचीही ताकद असते. ती ताकद एकत्रित झाल्यानंतर आणखी जागा वाढणार. या मंत्रिमंडळामुळे आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. मग हे मंत्रीमंडळ चालेल कसं? यांना एवढी मंत्रीपदं दिली, मग तुम्हाला काय मिळेल? त्यांना काय मिळेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत. हे सगळं प्लॅन करून केलं आहे, म्हणून हा मंत्रीमंडळ विस्तार झाला. पुन्हा रविवारपर्यंत दुसरा मंत्रीमंडळाचा विस्तार होईल,” अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Was not need majority then why ajit pawar joins shinde fadnavis led govt sanjay shirsat reaction rmm
Show comments