राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार गट सत्तेत सहभागी होणं, ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीच राजकीय खेळी आहे, असा आरोप काही राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. यावर स्वत: शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. काहीही झालं तरी भाजपाबरोबर जाणार नाही, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. या सर्व घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाशी युती करण्याचा निर्णय शरद पवारांच्या संमतीशिवाय घेतला का? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, “लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करायचा असतो. लोकशाहीची हीच खरी पद्धत आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी बहुमताने हा निर्णय घेतला आहे.” मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, त्यांनी शरद पवार यांच्या कोल्हापूर येथे होणाऱ्या सभेवरही भाष्य केलं.
हेही वाचा- “आम्ही आमचाच टेंभा मिरवतोय, असं…”, शरद पवारांच्या कोल्हापुरातील सभेवर अजित पवारांची प्रतिक्रिया
“आम्ही आमचा टेंभा मिरवतोय, असं समजू नका”
“शरद पवारांनी कुठे सभा घ्यावी? हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला जे योग्य वाटतं, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही अनेक वर्षे सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. प्रशासनावर पकड असणारे कार्यकर्ते आहोत. तुम्ही कुणालाही खासगीत विचारा… आम्ही आमचा टेंभा मिरवतोय, असं कृपा करून समजू नका. शेवटी सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राबवायची असते. काही वेळेस विचारधारा वेगवेगळी असू शकते,” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- VIDEO: “एक-दोन कोटी मुस्लीम मेले, तरी…”, काँग्रेस नेत्याचं खळबळजनक विधान…
अजित पवार पुढे म्हणाले की, २०१९ मध्ये सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:ची विचारधारा बाजुला ठेवून शिवसेनेबरोबर आघाडी केली. शिवसेना आणि भाजपा २५ वर्षांपासून मित्रपक्ष होते. भाजपाबरोबर २५ वर्षे युती केलेला मित्रपक्ष अडीच वर्षे चालू शकतो. तर मग पुढच्या काळात युतीतील दुसरा राहिलेला मित्रपक्ष (भाजपा) तोही चालून घेतला पाहिजे. त्यामुळे आम्ही शरद पवारांपेक्षा काही वेगळी भूमिका घेतलीय, असं दाखवण्याचं काही कारण नाही.