राज्यात मागील काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जात आहे, मात्र तरी देखील रूग्णसंख्या अटोक्यात येत नसल्याने आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागतो की काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्शअवभूमीवर आज राज्यातील करोना परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला ऑनलाईन संबोधित केलं. यावेळी त्यांनी “काही कडक निर्बंध येत्या काही दिवसांत लावावे लागतील. ते उद्या किंवा परवा जाहीर होतील” असा सूचक इशारा दिला. यावरून भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे, आता अजून कुणाशी चर्चा करणार आहात , घ्या की निर्णय ….नेहमीप्रमाणेच या बाबतीतही निर्णय दिरंगाई. इतक्या महिन्यांत जे नाही झाले ते पुढच्या दोन दिवसांत काय मोठा चमत्कार घडणार आहे. अहो सत्य परिस्थिती, वास्तव काय समोर मांडताय…त्याची सर्वाधिक झळ तर आम्हाला बसतेय. या वास्तवाला जबाबदार कोण ? …चिंताजनक दिशेने तुम्हीच तर ढकलले.करोनाचे अवतार सांगताय पण सरकारचा खरा अवतार जनतेला दिसला.” असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

तसेच, “हा आजचा काय टीजर होता का ? ससपेन्स कसला ठेवताय आज मी पूर्ण लॉकडाउन घोषित नाही करत पण इशारा देतो ..हे काय आहे. लॉकडाउनला पर्याय अजूनही मिळालाच नाही, मग इतकी हवा कसली तयार केली? गांजलेल्या जनतेला आज ठोस निर्णयाची अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली.” अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

CM on Maharashtra Lockdown : लॉकडाउनबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “येत्या एक-दोन दिवसांत…!”

तर, “काही कडक निर्बंध येत्या काही दिवसांत लावावे लागतील. ते उद्या किंवा परवा जाहीर होतील. कार्यालयांना याआधीच सूचना दिल्या आहेत. काही नियम आधीच लागू आहेत. सगळ्या ट्रेन तुडुंब भरून चालल्या आहेत. रोजगार परत मिळतील, पण जीव परत मिळणार नाही”, असं मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलेलं आहे. तसेच, “आज मी पूर्ण लॉकडाउनचा इशारा देतो आहे, पण लॉकडाउन लागू करत नाही. पण दोन दिवसांत मला दृश्य स्वरूपात फरक दिसला नाही आणि ज्यांच्याशी मी बोलतोय, त्यांच्याकडून वेगळा पर्याय दिसला नाही, तर जगात ज्या प्रमाणे लॉकडाउनचे टप्पे जाहीर केले जातात, तसे करावे लागतील”, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे.

राज्यात लवकरच दररोज अडीच लाख चाचण्या केल्या जाणार – मुख्यमंत्री

याशिवाय “मी अजून काही जणांशी बोलत आहे. मला वेगळा उपाय हवाय. लॉकडाउन हा उपाय नाही. पण संसर्गाची साखळी तोडायची कशी? लसीकरण झाल्यानंतर देखील काही प्रमाणात संसर्ग होऊ शकतो. पण या सगळ्यापेक्षा मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही नियम पाळा”, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवलं.