अकोला : ऐतिहासिक वारसा व धार्मिक स्थळांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशीम जिल्ह्याच्या विकासाला गुंतवणुकीचे बळ हवे आहे. जिल्ह्यात सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांची संख्या वाढली तरी अपेक्षित गुंतवणूक झालेली नाही. तरुणाईच्या हाताला काम नसल्याने मोठ्या प्रमाणावर त्यांचे स्थलांतरण होते. आरोग्यासह दळणवळणाच्या सुविधा वाढल्याने जिल्हावासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. जिल्ह्याच्या माथ्यावर लागलेला मागासलेपणाचा शिक्का पुसून काढण्यासाठी औद्योगिक विकासाला गती देण्याची गरज आहे.

१ जुलै १९९८ मध्ये वाशीम जिल्ह्याची निर्मिती झाल्यावर अडीच दशकांहून अधिक काळापासून विकासासाठी संघर्ष सुरूच आहे. देशातील आकांक्षित जिल्ह्यांमध्ये वाशीमचा समावेश झाला. आरोग्य, पोषण, शिक्षण, शेती व सिंचन, आर्थिक समावेशता, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे आव्हान आहे. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीने सकारात्मक परिणामदेखील दिसून आले. मात्र, उद्याोगांच्या बाबतीत फारसे अनुकूल चित्र नाही.

मोठे उद्याोग तर नाहीच. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्याोगांची संख्या वाढली. परंतु जिल्ह्यात अपेक्षित गुंतवणूक मिळाली नाही. सक्षम उद्याोगांअभावी रोजगाराचा प्रश्न कायमच. औद्याोगिक वसाहतीमधील उद्याोगांची संख्या अतिशय नगण्य. अपवाद वगळता बहुतांश उद्याोगांची वाताहत झाली. पूर्वी जिनिंग प्रेसिंग, कृषी प्रक्रिया उद्याोगांचे अस्तित्व होते. आर्थिक संकटामुळे ते बंद पडले. सुशिक्षित तरुणांना रोजगारासाठी मोठ्या शहरांची वाट धरवी लागते.

शेतमालावरील प्रक्रिया उद्याोगासाठी पोषक वातावरण असताना त्याच्या उभारणीकडे दुर्लक्ष झाले. मोठी बाजारपेठ नाही. मुख्य पीक सोयाबीनसह गहू, हरभरा, तूर, उडीद, संत्री, हळद, कांदा यासह विविध पिकांच्या भावाचा प्रश्न निर्माण होतो. शेतकऱ्यांना पडलेल्या भावात माल विकावा लागत असल्याने आर्थिक नुकसान होते. विकासासाठी उद्याोग, व्यवसायाच्या विस्ताराची आवश्यकता आहे.

वाशीम-बडनेरा रेल्वेमार्ग रखडला

राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात परिवर्तन करून जिल्ह्यात ३८६ कि.मी. रस्त्यांची बांधणी झाली. जिल्ह्यातून ९७ कि.मी.चा समृद्धी महामार्ग जातो. वाशीम-बडनेरा रेल्वेमार्गाचा मुद्दा राज्य शासनाकडे रखडला असून दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरून थेट राजधानी मुंबईला जोडणाऱ्या गाडीची प्रतीक्षाच आहे.

आकडेवारी काय सांगते?

जिल्ह्यात उद्याोगांची संख्या १४ हजार असून त्यात सर्वाधिक सूक्ष्म १३ हजार ७४३, लघू २३७ व मध्यम २० उद्याोगांचा समावेश आहे. त्या माध्यमातून ४६ हजार २१० रोजगार निर्मिती झाल्याचा दावा प्रशासनाने केला. उद्याोगाच्या संख्येसोबतच वीज वापरदेखील वाढला. २०२२-२३ वर्षामध्ये ७३३, २०२३-२४ मध्ये ७८९, तर डिसेंबर २४ पर्यंत ६२५ मेगावॉट विजेची मागणी जिल्ह्यात नोंदवली गेली. सूक्ष्म उद्याोगांची संख्या वाढली असली तरी गुंतवणुकीचा विस्तार झालेला नाही.

लाभार्थींना घराच्या स्वप्नपूर्तीची अपेक्षा

लाभार्थींना घराच्या स्वप्नपूर्तीची अपेक्षा असून विविध योजनांतर्गत ६३ हजार ७१५ घरकूल मंजूर आहेत. शिक्षणाच्या दर्जाचा प्रश्न कायम आहेच. दहावीच्या विद्यार्थी संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत नगण्य वाढ झाली. २०२४ मध्ये १९ हजार ७६५, तर २०२५ मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या २० हजार १७९ वर पोहोचली. विद्यार्थी गळतीचे प्रमाण रोखण्याचे लक्ष्य आहे.