राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा लेझीम खेळतानाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. भाजपातील डॅशिंग आणि उत्साही नेते म्हणून ओळखले जाणाऱ्या गिरीश महाजन यांनी गुरुवारी नवरात्रीनिमित्त आयोजित गरब्यात ठेका धरला. महाजन यांचा गरबा खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
देशभरात नवरात्रौत्सव साजरा केला जात असून यानिमित्त ठिकठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवलीत राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी ‘नमो रमो दांडिया’ उत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवात गुरुवारी गिरीश महाजन हे देखील सहभागी झाले. गरब्याची गाणी सुरु होताच महाजन यांची पावले थिरकू लागली आणि काही क्षणातच महाजन, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार हे तिघेही चक्क गरबा खेळू लागले. हिंदी गाण्यांवर या तिघांची पावले थिरकली. भाजपाचे मंत्री आणि आमदारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
दरम्यान, भाजपाच्या 6 खासदार आणि 50 आमदारांची जागा धोक्यात ही बातमी म्हणजे सोशल मीडियावरील टाइमपास असून त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचा दावा महाजन यांनी केला. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये संपूर्ण देशात विजेची मागणी वाढते. त्यामुळे कोळशाचा तुटवडा जाणवू लागला आहे. केंद्राकडून कोळसा यायला काहीसा विलंब होत असला तरी ही येत्या १० – १२ दिवसात ही समस्या दूर होईल असे त्यांनी सांगितले.