ठिकठिकाणी कार्ड टाकून पसे काढण्याचे एटीएम मशिन आपणास माहिती आहे, परंतु तहानलेल्यांना थंड आणि स्वच्छ पाणी देणारे जिल्ह्य़ातील पहिले असे एटीएम मशिन जिल्हाधिकारी कार्यालयात बसविण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी कामे घेऊन येणाऱ्यांना स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.
बुलढाणा अर्बन बॅंक व एएनएस इंफोव्हॅली यांच्यावतीने हे मशिन विनामूल्य बसविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी एटीएम मशिनचा शुभारंभ केला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, बंॅकेचे अध्यक्ष चांडक, अमलवार यांचीही भाषणे झाली. अमलवार येथे खासगी आयटीआय चालवितात. त्यांच्या आयटीआयमधून उत्तीर्ण होऊन विविध ठिकाणी नोकरीला असलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी हे वॉटर एटीएम मशिन तयार केले असून त्यांनी बनविलेले पहिले एटीएम मशिन जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आले. या मशिनमध्ये एक रुपयाचे नाणे टाकल्यास एक लिटर, पाच रुपयाचे नाणे टाकल्यास दहा लिटर, तर दहा रुपयाचे नाणे टाकल्यास वीस लिटर पाणी एटीएम मशिनमधून इच्छुकांना उपलब्ध होते. कोणीही नाणे टाकून पाणी उपलब्ध करून घेऊ शकतात. पाण्यासाठी आकारण्यात येणारी रक्कम नाममात्र असून नागरिकांना पाण्याबाबतची शिस्त राहावी, यासाठी हे शुल्क आकारण्यात येत आहे. यातून एटीएम मशिनची देखभाल व दुरुस्तीची कामे केली जातील, असे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.