सलग तीन वर्षांच्या दुष्काळामुळे गेल्या वर्षी मराठवाडय़ात चार हजारांहून अधिक टँकर लागले. टँकरने पाणी पुरवण्यासाठी दर वर्षी होणारा कोटय़वधींचा खर्च लक्षात घेता बंद पाइपद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी केली जाणारी तजवीज म्हणजे पाणी ग्रीड. देशभरात गुजरात, तामिळनाडू आणि नव्याने तेलंगणा राज्यात पाणीग्रीड योजना हाती घेण्यात आली आहे. त्यातील गुजरातची योजना नर्मदा १३२ शहरांसाठी आहे. १८८९ किलोमीटरच्या मुख्य जलवाहिन्या तेथे आहेत. शाश्वत पाणी स्रोत उपलब्ध असल्याने ही योजना यशस्वी झाली. तेलंगणामध्ये ५ हजार ५०० किलोमीटरसाठी ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या नव्या राज्याने केली आहे. प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी तेलंगणाने १०० कोटी रुपयांच्या निधीची तजवीज केली आहे. मराठवाडय़ात १२ हजार ९७८ गावे व वाडय़ा वस्त्यांपैकी ९ हजार ७०८ ठिकाणी पाणीपुरवठय़ाची योजना आहे. मात्र, शाश्वत पाणी नसल्याने मराठवाडय़ाचा टँकरवाडा होतो. त्यावर बंद पाइपने पाणीपुरवठा ही उपाययोजना हाती घेण्यात आली आहे.
कशी असेल योजना?
मराठवाडय़ातील आठ जिल्हय़ांसाठी २०५०पर्यंत शहरी भागातील व्यक्तींसाठी १३५ लिटर पाणीपुरवठा व ग्रामीण भागात ७०लिटर पाणीपुरवठा करता यावा यासाठी ४६.४१ टीएमसी पाणी लागेल. मराठवाडय़ात पाणी उपलब्ध असेल तर जवळच्या स्रोतातून पाणी उपसा करायचा आणि टंचाईच्या काळात अन्य भागातून पाणी आणायचे, असे नियोजन आहे.
कार्यवाहीची गरज
- पिण्याचे पाणी, उद्योगांसाठी पाणीपुरवठा आणि पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष अधिकार असणारे मंडळ तयार करणे आवश्यक
- धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे
- मराठवाडा पाणी ग्रीड योजनेचा हा प्राथमिक अहवाल आहे. त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्यास नुकतेच १५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.
टंचाईच्या काळात किती आणि कोठून लागेल पाणी
- उजनी धरणातून मांजरा धरणात : ५.८५ टीएमसी पाणी
- जायकवाडीच्या वरच्या धरणातून : ८.८६ टीएमसी पाणी निळवंडे धरणातून पाणी अपेक्षित आहे.
- खडकपूर्णा : ०.८३ टीएमसी
- इसापूर : ३.३८ टीएमसी
- वाघुर : ०.१० टीएमसी टंचाईच्या काळात दरडोई निकषापेक्षा ५० टक्के निकषानुसार २३.२६ टीएमसी पाणी लागणार आहे.
कसे येईल पाणी?
- जायकवाडी धरणाच्या वरील भागातील धरणातून गुरुत्वाने नलिकाद्वारे पाणी सोडणे (२०० किलोमीटरची लोखंडी पाइपलाइन)
- उजनी धरणातील पाणी मांजरा धरण क्षेत्रापर्यंत उपसा करून धरणात सोडणे (२५०० मि.मी. व्यासाची १२५ किलोमीटरची जलवाहिनी)
- इसापूर धरणातील पाणी मनार धरणात सोडणे (१०० किलोमीटर १२५० मिमी व्यासाची लोखंडी पाइप)
गावे आणि अंदाजित तरतूद
- जालना जिल्हय़ातील ५७२ गावांसाठी १४७८.३९ कोटी
- इसापूर ते मनारसाठी ४५९ कोटी
- उजनी ते मांजरा ९८४.४० कोटी
- निळवंडे ते जायकवाडी ८८२.९८ कोटी
- जायकवाडी ते माजलगाव ३५८.३२ कोटी
- जलवाहिन्या जोडण्यासाठी २ हजार ६८४ कोटींची योजना
- मराठवाडय़ातील ८ जिल्हय़ातील ४० टक्के गावांसाठी ५४४० कोटी
- तीन टप्प्यांतील कामांसाठी तब्बल १५ हजार कोटींची गरज