सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे राज्यातील १४ जिल्ह्यामध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. सप्टेबर महिन्याखेर राज्यात सरासरीच्या ७७ टक्के पाऊस झाला असून २०० तालुक्यांत ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील धरणांमधील आजचा एकूण पाणीसाठा २६ हजार ७३६ दशलक्ष घनमीटर असून तो प्रकल्पीय पाणी साठय़ाच्या ६५.४८ टक्के आहे. त्यातही मराठवाडय़ातील पाणीसाठा जेमतेम २७.७९ टक्के असून नाशिक विभागातील पाणीसाठा ६४.९५ टक्के आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्यामुळे तेथील शेती संकटात आहे. शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

मराठवाड्यामध्ये या वर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे प्रत्येकवर्षीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. पण जलयुक्त शिवारामुळे काही ठिकाणी परिस्थिती अटोक्यात आहे. मात्र, येणाऱ्या काही दिवसांमध्ये टँकरच्या संखेत वाढ होईल अशी शक्यता बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली आहे. ऊस, केळी आणि मोसंबीच्या पिकांना इतर पिकांपेक्षा पाण्याचा वापर जास्त होतो. त्यात पाण्याची पातळी खालवली आहे. पाण्याच्या खालवणाऱ्या पातळीवर नासानेही चिंता व्यक्त केली आहे. केळी, मोसंबी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ड्रॉप इरिगेशन पद्धतीचा वापर करावा अशी विनंती लोणीकर यांनी केली.

ताज्या आकडेवारीनुसार, सप्टेबरअखेर महाराष्ट्रातील वाड्या आणि गावांमध्ये सध्या ३२९ टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. गतवर्षी यावेळी १०७ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. ऑक्टोबरच्या १५ तारखेच्यादरम्यान मान्सून माघारी परतताना पावसाने हजेरी लावल्यास स्थिती सुधरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे दक्षिण-पश्चिम मान्सून मुंबईसह महाराष्ट्रातून परतला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे.

मुंबईकरासाठी दिलासादायक बाब म्हणजे, मुंबई आणि उपनगराला पाणीपुरवठा करणारे धरणे ९० टक्केपेक्षा जास्त भरली आहेत. महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जलसंकट उभा राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठवाड्यामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. उन्हाळा आणखी सहा महिने लांब आहे तरीही लोक आताच पाण्यासाठी त्रस्त आहेत. शेतांमधील पिके पाण्याअभावी वाया जात आहेत. या पाश्र्वभूमीवर मराठवाडय़ातील औरंगाबाद,उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार,जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्य़ांत दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे