प्रशासनाच्या कुचकामी वृत्तीमुळे आज जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना फ्लोराईडयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे. या जिल्ह्यातील २५ जलस्रोतांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण अधिक आढळल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने या जलस्रोतांवर ६२ लाख ५० हजार रुपये खर्च करून मशिन बसविल्या होत्या. परंतु आज त्या सर्व बंद असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

फ्लोराईडयुक्त पाणी पिल्याने अनेक प्रकारच्या व्याधी जडू शकतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. ज्या जलस्रोतांमध्ये एका लिटरमध्ये १ ते १.५ मिलिग्रॅमपेक्षा जास्त फ्लोराईडची मात्रा आहे अशा जलस्रोतांचे पाणी शरीरासाठी घातक असते. प्रशासनाच्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या २५ जलस्रोतांमध्ये फ्लोराईडची मात्रा जास्त असल्याची बाब उघड झाली होती.
गोंदिया तालुक्यातील पिपरटोला, जगनटोला, नवरगाव-कला, खमारी, आमगाव तालुक्यातील किडंगीपार, कुंभारटोली, फुक्कीमेटा, वाघडोंगरी, सोनेखारी, येरमाडा, जांभुळटोला, पांगोरी, तिरोडा तालुक्यातील दादरी, घाटकुरोडा, चिरेखानी, मुंडीकोटा, बोदलकसा, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुर्रा, वडेगाव, सडक अर्जुनी तालुक्यातील पाटेकुर्रा, दुंडा व गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा व आसलपाणी येथील जलस्रोतांचा यात समावेश आहे. यात फ्लोराईडचे प्रमाण २.६४ ते ३.७६ मिलिग्रॅम असल्याचे आढळले होते. यावर उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेने ३ ऑक्टोबर २०१२ च्या जल व्यवस्थापन समितीच्या बठकीत या जलस्रोतामध्ये फ्लोराईडची मात्रा कमी करण्यासाठी ठराव पारित केला. निधीला मंजुरीही देण्यात आली.
नागपूरच्या एन्विरो टेक्नो कन्सल्टंट कंपनीला फ्लोराईडची मात्रा कमी करणाऱ्या मशिन खरेदी करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. ६ नोव्हेंबर २०१२ मध्ये देयकेही अदा करण्यात आली, परंतु सध्या जलस्रोतांवरील मशिन बंद आहेत.

‘माहिती घेऊन काय ते सांगतो’
मुख्य म्हणजे, या मशिन बसवताना यांत्रिकी विभागाकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. त्यामुळे या मशिनची देखभाल दुरुस्ती कुणी करायची, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. आपण नव्याने रुजू झालो असून या मशिन दोन वर्षांपूर्वी बसविण्यात आल्या असून त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच नक्की काय ते सांगता येणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शर्मा यांनी सांगितले.

Story img Loader