पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या प्रश्नावर मात करण्यास लोकजागृतीच आवश्यक असून, या वर्षी बाटलीबंद पाण्याची विक्री २७ हजार कोटींपेक्षा अधिक झाल्याचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी सांगितले.
लातूर महापालिका व फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार अमित देशमुख होते. गृहराज्यमंत्री प्रा. राम िशदे, खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार पाशा पटेल, महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, अॅड. विक्रम हिप्परकर, प्रा. बी. व्ही. मोतीपवळे आदी उपस्थित होते.
राजेंद्रसिंह म्हणाले, की लातूर शहर पठारावर वसले आहे. पठारावर पाणी मुरण्याचे प्रमाण कमी असते. पावसावर लातूरकरांची पिण्याची अडचण दूर होणार नाही. राजस्थानमध्ये पावसाचे पाणी जमिनीच्या खाली टाकीत साठवून ते अडचणीच्या काळात वापरले जाते, त्याच पद्धतीने भविष्यात लातूरकरांना पाण्याचा वापर करावा लागेल. हे पाणी अतिशय शुद्ध असते. बाटलीबंद पाण्याचा वापर हा कोणालाही परवडणारा नाही. या वर्षी देशात २७ हजार कोटी रुपयांचे बाटलीबंद पाणी विकले गेले आहे. पुढच्या वर्षी यात काही हजार कोटीची भर निश्चितच पडेल. नवे सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार मोहीम चांगल्या पद्धतीने राबवत असून त्याची देशभर आपण प्रशंसा करीत आहोत. या योजनेसाठी केवळ लोकसहभाग देऊन लोकांना गप्प बसता येणार नाही. योजनेच्या देखभालीकडे लक्ष दिले नाही, तर ही योजना पुन्हा एकदा कंत्राटदारांच्या हातात जाण्याचा धोका आहे.
महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी महापालिकेच्या वतीने शहरातील २०० हरितपट्टय़ांवर पुनर्भरणाचे काम हाती घेतले असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी शहरी भागातील लोकांनी जमिनीत पाणी मुरवण्याच्या मोहिमेत सहभाग द्यावा. शहर परिसरात एन. ए. झालेल्या खुल्या प्लॉटमध्ये खड्डे खोदून पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करावे. हरितपट्टय़ात झाडे लावावीत. एनए झाल्यानंतर तीन वर्षांत ही कार्यवाही न केल्यास एनएचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा दिला. येत्या ऑगस्टमध्ये परवाना रद्द करण्याची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले. पाण्याच्या संवर्धनात आधी केले मग सांगितले, याप्रमाणे प्रत्येकानेच आपली जबाबदारी वठवली पाहिजे, तरच त्यांना दुसऱ्याला उपदेश करण्याचा अधिकार पोहोचेल, असे आमदार देशमुख म्हणाले. खासदार गायकवाड यांनी पाणी बचाव अभियानासाठी खासदार निधीतून २५ लाख देण्याची घोषणा या वेळी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा