नाशिक जिल्ह्य़ातील नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून औरंगाबादच्या वैजापूर व गंगापूर तालुक्यांमधील ६९ गावांना पिण्यासाठी ८५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यावर मंगळवारी मुंबईत जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत एकमत झाले. दरम्यान, पूर्वी केलेल्या मागणीप्रमाणे २२ मार्चपर्यंत जलद कालव्यात हे पाणी सोडले गेले नाही, तर शनिवारी २३ मार्चला वैजापूरमध्ये आंदोलन करण्याचा पवित्रा शिवसेनेचे आमदार वाणी यांनी घेतला आहे.
नाशिक व औरंगाबाद विभागांचे आयुक्त, तसेच जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तटकरे यांच्या दालनात हे पाणी सोडण्याबाबत मंगळवारी बैठक झाली. या बैठकीस औरंगाबादमधील एकही मंत्री वा आमदार उपस्थित नव्हता. परंतु या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या वैजापूर-गंगापूरच्या आमदारांनाही निमंत्रित केले नव्हते, अशी माहिती मिळाली. कोपरगावचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे हे मात्र या बैठकीस हजर होते.
त्यांनी नांदूर-मधमेश्वरचे पाणी कोपरगावच्या शेतीसाठी देण्याची जोरदार मागणी या बैठकीत केली. मात्र, याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. परंतु पिण्याच्या पाण्यास प्राधान्य या सूत्रानुसार वैजापूर-गंगापूरच्या ६९ गावांसाठी पाणी सोडले जाण्यावर बैठकीत एकमत झाले. पाणी सोडण्याचे ठरले असले, तरी हे पाणी कधी सोडले जाणार, त्याची आता उत्सुकता आहे.
तीव्र प्रतिक्रिया
गेल्या १५ फेब्रुवारीला औरंगाबादमध्ये आयोजित उच्चस्तरीय बैठकीत ठरल्याप्रमाणे मार्च व मे महिन्यांत प्रत्येकी १० दिवस नांदूर-मधमेश्वरमधून पिण्यास पाणी दिले जाणार आहे. परंतु मार्चमध्येच पाणी देण्यात अडथळा निर्माण केला गेल्याने लाभक्षेत्रात याची तीव्र प्रतिक्रिया उमटली.
त्यातून गेले तीन-चार दिवस विविध पक्ष-संघटनांकडून जोरदार आंदोलन झाले. २२ मार्चपर्यंत पाणी सोडले न गेल्यास शिवसेनेतर्फे शनिवारी वैजापूरमध्ये व्यापक आंदोलन करण्यात येईल, असे आमदार वाणी यांनी सांगितले. आपण स्वत: व गंगापूरचे अपक्ष आमदार प्रशांत बंब दोघेही पाणीप्रश्नी उद्या (बुधवारी) मंत्री तटकरे यांची भेट घेणार असल्याची माहितीही वाणी यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा