कल्पेश भोईरकल्पेश भोईर

गेले पाच महिने नायगाव पूर्वेकडील वाकीपाडा येथे सरगम इमारतीच्या शौचालयाच्या वाहिनीतील पाणी मुख्य रस्त्यावर येत आहे. यासंदर्भात अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

इमारत बांधताना सांडपाणी निचरा होण्यासाठी नियोजन करण्यात आले नाही. असे असतानाही पालिकेने या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्रे दिलेच कसे, असा सवाल येथील रहिवाशांनी केला आहे.

गेले काही महिने यावर तक्रार करूनही उपाययोजना करण्यात आलेली नाही. दिवसेंदिवस हे पाणी अधिक प्रमाणात वाहत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.

शौचालयाचे सांडपाणी सार्वजनिक रस्त्यावर येत असल्याच्या संदर्भात पालिका व ग्रामपंचायत चंद्रपाडा यांच्याकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. यावर पालिकेने पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतीची असल्याचे म्हटले आहे.

जलवाहिनीला धोका कायम?

सांडपाणी हे या भागातून गेलेल्या जलवाहिनीजवळच साचून राहत असल्याने पालिकेची जलवाहिनीही धोक्यात आली आहे.  काही वेळा जलवाहिन्यांना अतिउच्चदाबामुळे गळती लागण्याचे प्रकार होत असतात. जर चुकून या परिसरात गळती किंवा काही अडचणी निर्माण झाल्यास हे शौचालयाचे घाण पाणी या जलवाहिन्यांत  जाऊन पिण्याचे पाणी दूषित होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

रस्त्यावर येणाऱ्या सांडपाण्याच्या संदर्भात तक्रार आली त्यानुसार जागेवर जाऊन पाहणी केली आहे. यावर उपाययोजना करण्याच्या  संदर्भात ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्यासोबत चर्चा सुरू आहे.

– राजेंद्र कदम, साहाय्यक आयुक्त प्रभाग समिती ‘जी’

रस्त्यावर दुर्गंधीयुक्त सांडपाणी येत आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडून संबंधित मालकाला नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच पालिकेलाही याचा पत्रव्यवहार केला आहे.

– एस. एस. जाधव, ग्रामसेवक ग्रामपंचायत चंद्रपाडा

Story img Loader