कराड: कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ पाणीप्रश्नावर गेल्या ३५ वर्षांपासून झुलवत ठेवण्यात आल्याचे टीकास्त्र सोडताना, येत्या दोन वर्षांत ‘कराड उत्तरे’तील पाणी प्रश्नच शिल्लक ठेवणार नसल्याची ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी दिली.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण आघाडीच्या प्रचार शुभारंभ सभेदरम्यान, पाल (ता. कराड) येथे आमदार घोरपडे बोलत होते. ते म्हणाले, पाल इंदोली उपसा जलसिंचन योजनेला ५० मीटरवरून १०० मीटर हेडची मंजुरी मिळाल्याशिवाय पाल- उंब्रज विभागात जाहीर सभा घेणार नसल्याचा शब्द आपण विधानसभेवेळी दिला होता. त्यामुळे पाल इंदोली योजनेला १०० मीटर हेडची मंजुरी घेऊनच आज पालच्या सभेत उभा राहिलोय. पाणी प्रश्न सोडवण्यात कुठेही कमी पडणार नसल्याचा विश्वास घोरपडे यांनी दिला.

पाल इंदोली उपसा सिंचन योजना पन्नास मीटर हेडची असल्याने या भागाला पाणी मिळत नव्हते, पाण्यासाठी या परिसराला झुलवत ठेवण्यात आले परंतु, याच खंडोबाच्या नगरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. त्यावेळी फडणवीस यांनी या योजनेसाठी सहकार्य करण्याचे दिलेले आश्वासन पाळले आहे.

लवकरच यासाठी निधी उपलब्ध होईल. तसेच हणबरवाडी- धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वित झाला असून, दुसऱ्या टप्प्याला निधी मंजूर करून आणला आहे. राजाचे कुर्ले व शामगावचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ‘टेंभू’तून पाणी दिले आहे. गणेशवाडी समर्थनगर उपसासिंचन योजनेसाठी मंजुरी आणली आहे. येत्या दोन वर्षांत कराड उत्तरमध्ये पाणी हा प्रश्न शिल्लक राहणार नसल्याचे घोरपडे यांनी ठामपणे सांगितले.

उंब्रजच्या उड्डाणपुलाची महिन्यात निविदा

उंब्रजच्या उड्डाणपुलासाठी सातत्याने मागणी झाली. आमदार नसतानाही या उड्डाणपुलाला मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न केले. आता केंद्रीयस्तरावर पाठपुरावा केला असून, महिनाभरातच उंब्रज उड्डाणपुलाची निविदा निघेल व उंब्रज बाजारपेठेशी निगडित गावांची समस्या कायमची दूर होणार असल्याचे घोरपडे यांनी सांगितले.

‘हणबरवाडी’संदर्भात मंत्रालयात बैठक

मुंबईत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समवेतच्या बैठकीत मसूर विभागातील हणबरवाडी धनगरवाडी योजनेस पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर बैठकीस जिल्ह्यातील मंत्रिगणही उपस्थित होते, असे आमदार मनोज घोरपडे यांनी सांगितले.