दिगंबर शिंदे
भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालातील धक्कादायक माहिती
गेली तीन वर्षे पावसाची अनियमितता आणि कमी झालेले प्रमाण, तुलनेत बागायती पिकासाठी होत असलेला पाण्याचा वारेमार उपसा यामुळे सांगली जिल्ह्य़ातील भूगर्भातील पाणी पातळी सरासरी दीड फुटाने घटली असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. जिल्ह्य़ात सर्वाधिक घट दुष्काळी जत तालुक्यात झाली असून येथील पाणी पातळी दीड मीटरने घटली आहे. तर पाण्यासाठी सधन समजल्या जाणाऱ्या वाळव्यातही बेसुमार उपशामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाने जाहीर केलेल्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. यानुसार जिल्ह्य़ाच्या भूजल पातळीत सरासरी दीड फुटाने घट झाली असून दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या तालुक्यातील घट तर याहून वेगाने वाढत असल्याची माहिती आहे. जिल्ह्य़ात पावसाचे कमी झालेले प्रमाण व बेसुमार पाणी उपशामुळे भूजल पातळीत ही घट झाल्याचे या अहवालात म्हटले असून ही घट चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. चिंतेची बाब म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षीच ही पातळी घटत चालली आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाने सांगली जिल्ह्य़ात ८४ निरीक्षण विहिरींचा अभ्यास करून भूजल पातळीचा आलेख तयार केला आहे. विभागाच्यावतीने वर्षांत किमान चारवेळा भूजल पातळीचा अभ्यास केला जातो. मार्च महिन्यातील अहवालानुसार जिल्ह्य़ात जत तालुक्यातील भूजल पातळीत सव्वा मीटरने घट झाली आहे. त्यानंतर आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातही हेच संकट निर्माण झाले आहे. कमी पाऊस अथवा अन्य जलस्रोतांच्या माध्यमातून जमिनीत कमी मुरलेल्या पाण्यापेक्षा पाण्याचा जादा वापर झाल्यानेच ही भूजल पातळीत घट नोंदविली गेली आहे.
ज्या भागात म्हैसाळ, ताकारी व टेंभू योजनेचे पाणी पोहोचले आहे, त्या ठिकाणी मात्र, पाणी पातळी स्थिर असली तरी ती समाधानकारक नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. पाऊस नसलेल्या ठिकाणच्या भूगर्भातील पाण्याचाही बेसुमार उपसा होत असल्यानेच हे संकट निर्माण झाले आहे. जत, आटपाडीसह काही भागाला परतीच्या मान्सूनवर अवलंबून राहावे लागत आहे. टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी टॅँकरसह इतर उपाययोजना जिल्हा प्रशासनाने केल्या असल्या तरी जिथे निसर्गच कोपला आहे, तिथे प्रशासनाचीही हतबलता दिसून येत आहे.
बेसुमार वापरामुळेही संकट
जिल्ह्य़ातील सधन तालुका असलेल्या वाळवा तालुक्यातील भूजल पातळीत यंदाही घट झाली आहे. या भागात उसाचे क्षेत्र मोठे असून उपलब्ध पाण्याचा जपून वापर करण्याऐवजी बेसुमार वापरामुळेच हे संकट निर्माण झाले आहे. वाळवा तालुक्याबरोबरच पलूस तालुक्यातील पाणी पातळी स्थिर असली तरी, त्यातही घट जाणवली आहे. केवळ पश्चिम भागातील शिराळा तालुक्यातील जलस्रोत समाधानकारक आहेत.