सांगली : मान्सून हंगामातील पहिल्या टप्प्यात कोयना, चांदोली धरणापेक्षा अलमट्टी धरणात पाणीसाठा जलदगतीने वाढत असून गेल्या पंधरा दिवसात अलमट्टी मध्ये १५.३६ टीएमसी, तर कोयनेमध्ये ५ आणि चांदोलीमध्ये १.३४ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. गेल्या दोन दिवसापासून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले असून गेल्या २४ तासात कोयना येथे १०२, महाबळेश्‍वरमध्ये ११४ आणि नवजा येथे ६२ मिलीमीटर पाउस नोंदला गेला.

मान्सूनमध्ये यंदा प्रथमच वळीव स्वरूपाचा पाउस झाला. या वेळी पश्‍चिम घाटात पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, या दरम्यान, जिल्ह्याचा दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या जत, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ आदी भागात वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. हंगामाच्या अखेरीस वाहणारी तासगाव, कवठेमहांकाळची अग्रणी नदी जूनमध्येच दुथडी भरून वाहू लागली. या तुलनेत पश्‍चिम घाटात पावसाचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात खरीप पेरण्याही रखडल्या आहेत.

हेही वाचा : “जयंतराव तुम्ही नकली वाघांबरोबर आहात, असली वाघांबरोबर या”, मुख्यमंत्री शिंदेंचा टोला

मात्र, वळीव पावसाच्या पाण्याने कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होउन हे पाणी अलमट्टी धरणात गेले. दि. ११ जून रोजी १२५ टीएमसी क्षमता असलेल्या अलमट्टी धरणात २१.६७ टीएमसी असलेला पाणी साठा २ जुलै रोजी ३७.०३ टीएमसीवर पोहचला आहे. तर कोयनेतील साठा १५.२३ वरून २०.२५, चांदोलीचा १०.३० वरून ११.८५ टीएमसी झाला आहे. म्हणजे कोयनेत ५.०२ तर चांदोलीमध्ये १.५५ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

हेही वाचा : सांगलीत आढळले अल्बिनो जातीच्या सर्पाचे पिल्लू

जिल्ह्यात शिराळा, वाळवा वगळता अन्य तालुक्यात तुरळक हजेरी आहे. गेल्या २४ तासात सर्वाधिक पावसाची नोंद शिराळा येथे १०.७ मिलीमीटर असून जिल्ह्यात सरासरी ४.३ मिलीमीटर पाउस झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.