केवळ धरणं उभारून चालणार नाही तर पाण्याचे व्यवस्थापन नियोजनबद्ध होणे काळाची गरज असल्याचे मत नामवंत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी मांडले. राजस्थानमध्ये पाण्याची वानवा असतानाही तेथे जलक्रांती झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कृष्णा सहकारी साखर कारखाना व कृष्णा कृषी महाविद्यालयातर्फे शिवनगर येथे आयोजित कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते शेती, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते मोठय़ा दिमाखात पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी सयाजीराव देशमुख (कडेपूर) हे अध्यक्षस्थानी होते. तर, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष सुरेश पाटील, कृषिमित्र अशोकराव थोरात यांची उपस्थिती होती.
डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, की राजस्थानमध्ये पाऊसमान कमी असून, पावसाचे पाणी सूर्यप्रकाशापासून वाचवत तेथे जलक्रांती साध्य झाली आहे. आज हा भाग कृष्णाकाठापेक्षा निश्चितच समृद्ध असून, राजस्थानच्या धर्तीवर सर्वत्र जलक्रांती अपेक्षित आहे. शेतकरी डुबूक पद्धतीने पाण्याचा अतिवापर करीत असल्याने कृष्णाकाठची जमीन क्षारपडच्या दिशेने जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. यावर शेतक-यांना जलसाक्षर करण्याचे काम कृष्णा कारखान्याने हाती घेऊन शेतकरी व सभासदांचे शेतीक्षेत्र क्षारपडपासून वाचवावे असे आवाहन त्यांनी केले.
जमीन ज्याप्रमाणे माता आहे. त्याचप्रमाणे पाणी हे पित्याची भूमिका बजावते. तरी, पाण्याची गरज पटवून देण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. मुबलक पाण्याच्या क्षेत्रातील लोकांना पाण्याचे महत्त्वच नाही. तरी, प्रत्येक थेंब काळाची गरज म्हणून त्याचे व्यवस्थापन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. हिरवाईने नटलेला कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा संपूर्ण परिसर आबासाहेब मोहिते यांच्या दूरदृष्टीतून उभारला आहे. इथे पशुधन नियंत्रणासाठी भरीव उपाययोजना आहेत. आता देशातील प्रदूषणमुक्त कारखाना म्हणून कृष्णा कारखान्याचे ओळख व्हावी असेही आवाहन डॉ. राजेंद्रसिंह यांनी केले.
सयाजीराव देशमुख म्हणाले, की अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा कारखाना ख-या अर्थाने सर्वसामान्य शेतक-याच्या मालकीचा झाला असून, कारखान्याची यशस्वी घोडदौड सुरू आहे. शेतक-यांनी आपल्या कमाईच्या पैशाचे व्यवस्थापन केले, तरच त्याला उतारवयात सुख मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अविनाश मोहिते म्हणाले, की कृष्णा कारखान्याच्या शेतकरी, सभासदांना पाण्याचे महत्त्व समजावे म्हणूनच जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांना निमंत्रित करण्यात आले आहे. डॉ. राजेंद्रसिंह यांनी मांडलेले विचार आपण आत्मसाद करावेत. क्षारपड जमिनीबाबत डॉ. राणा यांनी सुचवल्याप्रमाणे कृष्णा कारखाना ठोस पावले उचलून राजस्थानच्या धर्तीवर कृष्णाकाठीही जलक्रांती करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रास्ताविक अशोकराव थोरात यांनी केले. कार्यक्रमात कृष्णा कृषी सल्ला विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
 

Story img Loader