प्रमुख जलवाहिनी फुटल्याने शुक्रवारी शहरात पाणी पुरवठा होऊ शकला नाही. वाहिनी दुरूस्तीच्या कामासाठी अहमदनगरहून तंत्रज्ञ येणार असल्याने दुरूस्तीस विलंब लागण्याची शक्यता पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
जळगावसह जामनेर शहर व काही गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात यंदा अपेक्षित जलसाठा न झाल्याने शहरात पाणी कपात करण्यात आली आहे. वाघूर धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपल्याने आता मृत साठय़ातून पाणी घेण्यात येत आहे. हे पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत टिकविणे आवश्यक असल्याने शहरात दिवाळीपासून दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. वाघूर प्रकल्पातून शहरात येणाऱ्या जल वाहिनीतून मेहरूण परिसरातील स्मशान भूमीजवळ गुरूवारी गळती सुरू झाली. त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्यात झाला. ही गळती दुरूस्त करणारी यंत्रणा महापालिकेकडे नसल्याने अहमदनगरहून मक्तेदार व तंत्रज्ञ आल्यावरच जळगावचा पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकेल. आ. सुरेश जैन यांनी जळगाव शहरासाठी कोटय़वधी रुपये खर्च करून राबविलेली वाघूर पाणी पुरवठा योजना गैरव्यवहार व भ्रष्टाचारामुळे आधीच वादग्रस्त ठरली आहे.
जळगाव महापालिकेकडे वाहिनी दुरूस्त करणारी यंत्रणाच नाही. क्रेन व मोठे वेल्डिंग यंत्र त्यासाठी लागते. अहमदनगर येथील कोटेचा नामक मक्तेदाराला या दुरूस्तीसाठी बोलवावे लागते. त्या मक्तेदाराला कोटय़वधी रुपये पालिकेकडून देणे बाकी आहे. त्यामुळे आधी पैसे द्या, मग काम करतो असे त्याचे म्हणणे असते. गेल्या महिन्यात झालेली गळती बंद करण्यापूर्वी मक्तेदाराला महापालिकेने दहा लाख रुपये दिले होते. आता पुन्हा गळती सुरू झाल्याने मक्तेदाराला पैसे देणे भाग आहे. जो पर्यंत निकृष्ट दर्जा वाहिनी पूर्णपणे बदलण्यात येत नाही, तोपर्यंत हे असेच चालणार, असे पाणी पुरवठा विभागाच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले.

Story img Loader