जालना – जालना जिल्ह्यातील ३८७ गावे आणि ३३ वाड्यांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा अद्याप अडीच महिने दूर असल्याने पुढील काळात पाणीटंचाईच्या गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे हातपंप आणि विहिरींचे पाणी कमी होत चालले आहेत. जिल्ह्यातील ६४ मध्यम आणि लघुसिंचन प्रकल्पांत मार्चच्या शेवटच्या आठवड्यात २८ टक्केच उपयुक्त साठा शिल्लक राहिलेला आहे.

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जिल्ह्यातील ३८७ गावांच्या पाणीपुरवठ्याचा टंचाई आराखडा तयार करण्यात आलेला आहे. टंचाई जाणवणाऱ्यांमध्ये सर्वाधिक १७३ गावे जालना तालुक्यातील आहेत. बदनापूर तालुक्यातील ३६ आणि भोकरदन तालुक्यातील ८५ गावांचा समावेश पाणीटंचाईच्या गावांमध्ये आहे.

जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाईच्या गावांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाने जानेवारी ते मार्च दरम्यानच्या काळातील पाणीटंचाई निवारणासाठी ४४ कोटी ९७ लाख रुपयांच्या टंचाई आराखड्यास मान्यता दिली आहे. विहिरींचे अधिग्रहण, पूरक पाणीपुरवठा योजना, तात्पुरती नळ योजना, टँकर इत्यादी उपाययोजनांचा समावेश आहे. टँकर सुरू करण्याच्या मान्यतेचेे अधिकार उपविभागीय (महसूल) अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.

जिल्ह्यातील ६४ मध्यम आणि जलसिंचन प्रकल्पांत मार्चच्या शेवटच्या आठवड्यात २८ टक्केच उपयुक्त जलसाठा आहे. १५ प्रकल्पांत उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिलेला नाही. दोन प्रकल्प कोरडे पडले आहेत. १७ प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा २५ टक्क्यांच्या आत आहे. जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठ्याचे प्रमाण ३१ टक्के एवढेच आहे. त्यापैकी कल्याण मध्यम प्रकल्पात उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिलेला नाही. कल्याण गिरजा (३३ टक्के), उर्ध्व दूधना (६०), जुई (३४), धामना (४३), जीवरेखा (२८), गल्हाटी (३५ टक्के) या प्रमाणे मध्यम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठ्याचे प्रमाण आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन-चार महिन्यांपासून पाणीटंचाईच्या गावांमध्ये वाढ होत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा अधिक गावांत पाणीटंचाईची चिन्हे दिसत आहे. जालनासारख्या शहरात आठ-दहा दिवस पाणीपुरवठा होत नाही. – भास्कर अंबेकर, जिल्हा प्रमुख (शिवसेना-ठाकरे).