सध्या महाराष्ट्राला परतीच्या पावसानं झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळल्याने नद्यांना पूर आला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव आणि एरंडोल परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. जळगाव शहरासह धरणगाव आणि एरंडोल येथे दूषित पाणी पुरवठा होत आहे.
अशी एकंदरीत स्थिती असताना पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. पुराच्या पाण्यामुळे पाणी पुरवठा करणारे पंपच बंद आहेत, त्यामुळे आकाशातून पाणी टाकू का? असं विधान त्यांनी केलं आहे. ते जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- “त्यांच्या मुलांनीच गेटबाहेर जाऊन…” भास्कर जाधवांच्या घरावरील हल्लाबाबत निलेश राणेंचं विधान
पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याबाबत प्रश्न विचारला असता गुलाबराव पाटील म्हणाले, सध्या नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे पाण्याचे पंप पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. तसेच या पंपामध्ये गाळ साचला आहे, ते दुरुस्त करता येणं शक्य नाही एवढी पाण्याची पातळी वाढली आहे.
हेही वाचा- नवाब मलिकांना दिलासा नाहीच! न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ
नदीला पूर आल्याने पाणी पुरवठा करणारे पंप सेट पाण्याखाली गेले आहेत. विहिरीही नदीमध्येच आहेत, मग पाणी आकाशातून टाकायचं का? असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं आहे. निश्चितपणाने पाण्याचा तुटवडा आहे, तो तांत्रिकदृष्ट्या तुटवडा आहे, याचं भांडवल कुणी करू नये, असंही पाटील म्हणाले.