सोलापूर : पंढरपूरच्या आषाढी वारीसह सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून चार टीएमसी पाणी सोडण्यात येत असून हे पाणी उद्या शनिवारी पंढरपूरच्या चंद्रभागेत पोहोचण्याची अपेक्षा आहे. उजनी धरणातील पाणीसाठा संपत आला असून सध्या उणे ३० टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सोलापूर शहरासाठी धरणात दुबार उपसा करून पाणी पूरवठा करण्याची वेळ आल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा >>> सरकारचा मोठा निर्णय! राज्यात आता नऊ नवीन आरटीओ
राज्यात प्रमुख धरणांपैकी समजल्या जाणा-या उजनी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १२३ टीएमसी एवढी आहे. परंतु प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे अवघ्या सहा महिन्यात धरणाने तळ गाठला आहे. सध्या एकूण ४४ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक असून यात उणे ३० टक्के (१५ टीएमसी) साठा राहिला आहे. धरणातील पाणीसाठ्याची दायनीय स्थिती पाहता शेतीसाठी पाणी पुरवणारे कालवा, बोगदा, सिंचन योजना, नदी आदी सर्व स्रोत बंद आहेत. मात्रही गळती आणि इतर कारणांच्या नावाखाली धरणातील पाणी पळविण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. सध्या जून महिना सरत आला तरीही पावसाचा एक थेंबसुध्दा पडत नसल्यामुळे उष्णतामान वाढले आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली सुमारे तीन लाख हेक्टर बागायती शेती धोक्यात आली आहे. दुसरीकडे सोलापूर शहरातही पाणीपुरवठ्याचे नियोजन अगोदरच कोलमडले असताना आता उजनी धरणातील पाणीसाठा संपत आला आहे. त्यामुळे धरणात दुबार उपसा करून पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. आणखी काही दिवस पावसाविना धरणात पाण्याची स्थिती खालावली तर दुबारऐवजी तिबार उपसा करून सोलापूरसाठी पाणीपुरवठा करावा लागणार आहे. अर्थात, त्यामुळे आठवडा किंवा दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्याची शोचनीय वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे.