सुहास सरदेशमुख

७७९ लाख क्विंटल उत्पादन, धरणांत फक्त अर्धा टक्के पाणीसाठा

दुष्काळात मराठवाडय़ात २३०० हून अधिक टँकर लागले आहेत, मात्र याच कालावधीत धरणातील बहुतांश पाणीसाठा उसासाठी वापरत मराठवाडय़ातील ४७ साखर कारखान्यांनी १६६ लाख १७ हजार मेट्रिक टनाचे गाळप केले. त्यातून ७७९.८१ क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. मात्र आता मराठवाडय़ातील मोठय़ा धरणांमध्ये केवळ अर्धा टक्के पाणीसाठा उरला आहे.

एका बाजूला जनावरांना पिण्याचे पाणी आणि चारा नाही म्हणून ६२५ चारा छावण्या ज्या मराठवाडय़ात सुरू करण्यात आल्या. तेथे ऊस आणि साखरेची ही आकडेवारी आश्चर्यकारक मानली जात आहे. केवळ मराठवाडा नाहीच तर दुष्काळात होरपळणाऱ्या सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्य़ांतही साखरेचे उत्पादन मुबलक झाले आहे.  सोलापूर जिल्ह्य़ातील ३१ साखर कारखान्यांमध्ये १६० लाख १४ हजार ७९५ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. त्यातून १६३ लाख ९६ हजार १४३ क्विंटल साखर उत्पादित झाली.  मराठवाडय़ातील दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. मराठवाडय़ात गेल्या पावसाळ्यात केवळ ४१ दिवस पाऊस झाला. त्यामुळे जायकवाडीसारख्या मोठय़ा धरणांमध्ये पाण्याची तूट निर्माण झाली. ९ टीएमसी पाणी नगर आणि नाशिकमधून सोडण्याचे आदेश झाले. खळखळ करून का असेना या जिल्ह्य़ांमकडून ४.२० अब्जघनफूट पाणी मिळाले. जसे पाणी मिळाले तसे जायकवाडीच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू झाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७० दिवस पाणी सुरू ठेवण्यात आले. कारण ऊस वाढला पाहिजे असा पाठपुरावाच मंत्र्यांनी केला होता. ज्या लातूर जिल्ह्य़ात पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे आणावी लागली, त्या जिल्ह्य़ात सर्वाधिक ३५ लाख २१ हजार १९९ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. त्यातून ४० लाख २८ हजार ५४५ टन साखर उत्पादित झाली. अहमदनगरमध्येही पाणीटंचाई आणि दुष्काळ स्थिती कायम होती. या जिल्ह्य़ातील २३ कारखान्यांमध्ये १५० लाख १६ हजार ३१५ क्विंटल साखर उत्पादित झाली. औरंगाबाद आणि नांदेड या दोन विभागातील दुष्काळ लक्षात घेता उसासाठी वापरले जाणारे पाणी भूगर्भातील जलस्रोत अधिक खोल नेणारी ठरू लागली आहे. उस्मानाबादसारख्या जिल्ह्य़ात ती उणे १३ इथपर्यंत खाली गेली आहे. एक हेक्टर ऊसवाढीसाठी कॅनॉलने ४४ हजार घनमीटर पाणी सोडले तर उसाच्या मुळाशी जाईपर्यंत २४ हजार घनमीटर एवढेच जाते, असे जलअभ्यासक प्रदीप पुरंदरे सांगतात. ज्या प्रमाणात साखर उत्पादित झाली आहे ते पाहता दुष्काळी भागात भरघोस साखरमाया दाटून आल्याचे दिसत आहे. एका बाजूला दुष्काळ आणि दुसऱ्या बाजूला निवडणुकांची तयारी जोमात असताना साखरधंदा मात्र तेजीत होता, असे चित्र दिसून येत आहे.

दुष्काळाच्या निकषात हिरवाईचा निर्देशांक मोजला जात होता. त्यामुळे काही तालुके दुष्काळी उपाययोजनातून पहिल्यांदा वगळण्यात आले होते. मात्र, नंतर राजकीय सोय म्हणून आणि रांगेत बसणाऱ्यांना दुजाभाव नको म्हणून काही तालुके समाविष्ट करण्यात आले. त्या बहुतांश तालुक्यांमध्ये उसाचे मोठय़ा प्रमाणात गाळप झाले. मराठवाडय़ात जालना जिल्ह्य़ातील समर्थ आणि सागर, लातूर जिल्ह्य़ातील मांजरा कारखान्याने सर्वाधिक आठ लाख ४३ हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात पाणीसाठा कमी असल्याने उद्योगाची पाणी कपात करण्यात आली आहे. टँकरने मराठवाडा व्यापलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ात सर्वाधिक टँकर आहे.

११,२५५ गावात पाणी टंचाई

राज्यात आतापर्यंत चार हजार ३२९ टँकर्सद्वारे ११ हजार २५५ गाव- पाडय़ांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धरण आणि तलावांमध्ये उपलब्ध मृत पाणीसाठय़ाचे नियोजन करुन त्याचा वापर प्राधान्याने पिण्यासाठी करण्याचे आदेश मुख्य सचिव यु.पी.एस.मदान यांनी मंगळवारी दिले.

१९५

या हंगामातील गळीत केलेले कारखाने

९४८.६८

मेट्रिक टन राज्यातील उसाचे गाळप

१०६६.६६

लाख क्विंटल साखर उत्पादन