अहिल्यानगरःमहापालिकेकडील जलसंपदा विभागाच्या थकबाकीमुळे पुन्हा शहरावर पाणीपुरवठा खंडित होण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीची महापालिकेकडे ११ कोटी ६३ लाख ७१ हजार ८३६ रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी जलसंपदाने महापालिकेला शनीवारपर्यंतची (दि. १५) मुदत दिली आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी मुळा धरणातून होणारा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा नोटिसीद्वारे दिला आहे.

जलसंपदा विभागाने मनपला यापूर्वीही नोटीस बजवली आहे. परंतु आता ही अंतिम नोटीस असल्याचे बजावण्यात आले आहे. मुळा धरणातून शहरासाठी घेतल्या जाणाऱ्या बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीची ही थकबाकी आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने यापूर्वी नोटिसा बजावल्या आहेत. मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी ही नोटीस बजावली आहे. मनपाच्या तिजोरीत खडखडट असतानाच या नोटीसीमुळे मनपा प्रशासन अडचणीत आले आहे.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत मनपाने २१ लाख २० हजार ६५६ ची पाणीपट्टीपोटी जमा केली आहे. उर्वरित थकबाकी भरण्याची लेखी सूचना जलसंपदाकडून देण्यात आली. मात्र मनपाने त्याची दखल घेतली नाही. परिणामी अधिभाराची रक्कमेत वाढ झाली आहे. मनपाकडे जानेवारीअखेर पाणीपट्टी १० कोटी २४ लाख ६८ हजार २८३, लोकल फंड १ कोटी २ लाख ६५ हजार १७५, दंडणीय आकार २० लाख १७ हजार ८५३, अधिभार १६ लाख २० हजार ५२४ अशी एकूण ११ कोटी ६३ लाख ७१ हजार ८३६ रुपयांची थकबाकी आहे. यापूर्वी जलसंपदाने मनपाला १० मार्चची मुदत रक्कम भरण्यासाठी दिली होती. आता १५ मार्चपर्यंत बाकी न भरल्यास पूर्वसूचना न देता, कोणत्याही क्षणी पाणीपुरवठा खंडित करण्याचा व उद्भवणारे जनक्षोभास मनपा जबाबदार राहील, अशा आशयाची नोटीस बजावली आहे.

Story img Loader