विश्वास पवार, लोकसत्ता 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाई: कोयना जलाशयालगतच्या सोळशी वाणवली (ता. महाबळेश्वर) भागातील ३२ गावात सध्या धरणाचे पाणी आटल्याने पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पिण्याच्या पाण्यासह, जनावरांनाही पाण्यासाठी दूर जावे लागत आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वरे गावचाही समावेश आहे. दरम्यान या परिसरातील नागरिकांचे पाण्याचे हाल संपुष्टात येण्यासाठी या भागात छोटे धरण बांधण्याचा प्रकल्प प्रस्तावित असून लवकरच चर्चेतून त्यावर तोडगा काढण्यात येईल असे या भागाचे लोकप्रतिनिधी राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.

कोयना नदीवरील शिवसागर जलाशयातील पाणी पातळी यंदा खूपच खालावली आहे. १०५ टीएमसी क्षमतेच्या या धरणातून शेती, वीज निर्मितीसाठी पाणी सोडले जात असल्याने तसेच तीव्र उन्हामुळे यंदा धरणातील पाणीपातळी मोठय़ा प्रमाणात खालावली आहे. बामणोली वानवली, तापोळा, सोळशी भागातील नदीपात्र कोरडे पडले आहे. कोयना नदी पत्राला ग्रामीण भागातील एखाद्या गावातील ओढय़ाचे स्वरूप आले आहे. याचा सर्वात जास्त फटका या सोळशी वाणवली (ता. महाबळेश्वर) भागातील गावांना बसला आहे. या गावांमधील नागरिकांचा पाणी पुरवठा मुख्यत्वे या धरणातील पाण्यावरच अवलंबून आहे. परंतु या परिसरातील धरणाचे पात्र कोरडे पडल्याने सध्या येथील नागरिकांना पाण्यासाठी डोंगरदऱ्यात वणवण भटकावे लागत आहे.

दुर्गम भागातील या लोकांची कायमस्वरूपी सोय करण्यासाठी व धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी शिवसागर जलाशयाला एक आडवी भिंत बांधून पाणी अडविण्याचा प्रस्ताव फार पूर्वीपासून आहे. 

पर्यटनाला फटका दरम्यान धरणाचे पात्रच कोरडे पडल्याने या पाण्याच्या सौंदर्यातून या भागात येणाऱ्या पर्यटकांची संख्याही रोडावली आहे. येथे या पर्यटकांना पाण्यातून फिरवून नौकानयन घडवणाऱ्या व्यावसायिकांचाही धंदा सध्या बसला आहे. अशा शेकडो बोटी सध्या मोकळय़ा पडून आहेत. धरणातील पाण्याची पातळी कायम राहीली तर या भागात एरवी चालणारा पर्यटन व्यवसायदेखील बारमाही सुरू राहील असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

धरण सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध सोळशी वाणवली(ता महाबळेश्वर) भागात दुर्गम भागातील ३२ गावातील लोकांना  जनावरांना पाण्याची उन्हाळय़ात चणचण जाणवते. यासाठी सोळशी परिसरात धरण बांधण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याचे शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर पाणी उपलब्धतेसाठी सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाला काही स्थानिकांचा विरोध आहे. सर्वाशी चर्चा करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच सर्वेक्षण पूर्ण करून पाणी उपलब्धतेचा दाखला मिळेल. त्यानंतर धरणाची पुढील कार्यवाही पूर्ण होईल. लवकरात लवकर पाण्याचे दुर्भिक्ष हटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. – मकरंद पाटील, स्थानिक आमदार