|| बिपीन देशपांडे

ग्रामीण भागात टंचाईची झळ

‘गावात टँकरने पाणीपुरवठा होतो. आम्हाला चार किंवा पाच दिवसाला पाणी मिळते, तेही दोनशे लीटर. त्यामुळे मिळालेले पाणी सोन्यासारखे तोळा-मासा या मापाने वापरावे लागते. पाऊसच झाला नाही तर सरकारला दोष देऊन कसे चालेल.’ कौडगावच्या रुक्मिणीबाई हिंगणे सांगत होत्या, ‘सध्या तरी पाणी मिळते, यातच समाधान.’

कौडगाव (जालना) हे गाव औरंगाबादपासून ४५ किलोमीटरवरील. अगदी जालना जिल्हय़ाच्या सीमेवरचे. कौडगाव (जालना) व कौडगाव (अंबड) हे दोन जुळे गाव असल्यासारखे. रुक्मिणीबाईंच्या घरात तीन मोठी माणसे व दोन छोटी. बुधवारी त्यांच्या घराजवळ जेव्हा टँकर आला तेव्हा त्यांनी ५० लीटरचा कॅन अधिकचा भरून घेतला. तोही मिनतवारी करून. ‘दोन दिवसांनी लेक येणार आहे, त्यासाठी पाण्याचे नियोजन’ त्या सांगत होत्या. सुमनबाईंच्याही घरी तीन मोठी माणसे व दोन छोटी.  चार दिवसाला २०० लीटर म्हणजे प्रतिदिन ५० लीटर पाणी. त्यात पाच माणसे. म्हणजे प्रत्येकी १० लीटर पाणी. त्यातच अंघोळी आणि त्यातच सांडपाणी. ज्यांच्या घरात जनावरे, त्यांचे हाल वेगळेच. कारण टँकर लोकसंख्येच्या प्रमाणात दिले जातात. त्यात जनावरांचे पाणी मोजले जात नाही.  टँकरचे पाणी गावात कोणी पिण्यासाठी वापरत नाही. कौडगाव (अंबड) किंवा गोलटगावातून २० लीटरचे बाटलीबंद पाणी आणले जाते. त्यासाठी एक एटीएमसारखे कार्ड आहे. शुद्ध पाणी प्रकल्पाच्या ठिकाणी ते एटीएम कार्ड दाखवले की पाणी जारमध्ये पडते. गोलटगाव चार ते पाच किमी अंतरावर. जाणे-येणे दहा कि.मी.च्या घरात. जवळपास दररोजचेच हे काम पुरुषांशिवाय होत नाही, असे रुक्मिणीबाई हिंगणे, सुमनबाई रोडे सांगत होत्या.

कौडगावसह टँकर जाणाऱ्या गावांमध्ये रस्त्याच्या बाजूला, घरासमोर पाण्याच्या टाक्या ठेवलेल्या दिसतात. ज्यांची घरे आतील बाजूला त्यांनाही टँकर जिथपर्यंत येऊ शकतो त्या ठिकाणी टाक्या ठेवाव्या लागतात. त्यात असते एखाद्याची टाकी मोठी. पाणी त्यांच्याकडे इतरांच्या मानाने मुबलक. पण  त्याविषयीही नागरिक सांगतात, की त्यांच्या घरात माणसे अधिक. म्हणजे सात-आठ सदस्य. त्यामुळे तेवढे पाणी लागतेच. टँकरचे पाणी आडात टाकले जाते. मग महिला त्या शेंदून हवे तसे वापरतात. सध्या जसा टँकरचा जोर आहे, तसा गावोगावी बाटलीबंद पाण्याची विक्रीही मोठय़ा प्रमाणात होऊ लागली आहे.

वस्तीवरील कुटुंबांची अडचण

अलीकडे गावातून अनेक जणांनी शेतशिवारातच घरे बांधली आहेत. वस्तीवर शेतातूनच जाण्याचा मार्ग आहे. टँकर तेथपर्यंत पोहोचणे शक्य नाही. शेतातील विहिरी, विंधन विहिरींना फारसे पाणी नाही. त्यांची मात्र अडचण होत असल्याचे कौडगाव (जालना) येथील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader