|| हर्षद कशाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड जिल्ह्यातील पाणी समस्येचे वास्तव

रायगड जिल्ह्य़ात टंचाई निवारण कार्यक्रमाअंतर्गत गेल्या वर्षी मंजूर करण्यात आलेल्या विंधन विहिरींपकी २६ टक्के कामेही पूर्ण होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे टंचाई निवारण कार्यक्रम कागदावरच राहिला. पाण्यासाठी गावातील लोकांची पायपीट मात्र तशीच सुरू राहिली आहे.

जिल्ह्य़ातील पाणी समस्येवर मात करण्यासाठी दरवर्षी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. यासाठी करोडो रुपयांची तरतूदही केली जाते, मात्र टंचाई आराखडय़ातील कामांची पूर्तता मात्र होत नाही. परिणामी पाणी समस्या जैसेथेच राहते. टंचाई आराखडा कागदावरच राहतो. जिल्ह्य़ातील पाणी समस्येचे हे भीषण वास्तव आहे.

मागील दोन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास टंचाई कार्यक्रमाअंतर्गत प्रस्तावित केलेल्या विंधन विहिरींपकी केवळ २६.६१ टक्के कामे पूर्ण झाली. यातही ज्या २७१ विधन विहिरींची कामे करण्यात आली त्यातील ४४ अपयशी ठरल्या. त्यांना पाणीच लागले नाही. त्यामुळे सुमारे  ८ लाख ८० हजार रुपयांचा खर्च वाया गेला. ही वस्तुस्थिती आहे. पण तरीही नव्याने ५७२ विधन विहिरींची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

रायगड जिल्ह्य़ात दरवर्षी सरासरी साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र योग्य नियोजनाअभावी हे पाणी समुद्रात वाहून जाते. भौगोलिक परिस्थितीमुळे येथील जमिनीत पाणी शोषून ठेवण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची भूजल पातळी मोठय़ा प्रमाणात घटते, आणि स्थानिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. स्थानिक प्रशासनाला या परिस्थितीचा पुरेपूर अंदाज असतो. मात्र योग्य वेळी उपाययोजना केली जात नाही.

वास्तविक पाहता पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पाणी पातळी लक्षात घेऊन संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू करायचे असते. जानेवारी अखेपर्यंत फेरआढावा घेऊन त्याला अंतिम स्वरूप देणे अपेक्षित असते, तर मार्च महिन्यापासून टंचाई कृती आराखडय़ातील कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणे गरजेचे असते. पण प्रशासकीय दिरंगाईमुळे टंचाई आराखडा तयार करण्यास उशीर होतो. त्यामुळे विधन विहिरींचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास मे महिनाच उजाडतो. बरेचदा वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने ठेकेदार विधन विहिरी खोदण्यास उत्सुक नसतात. या कारणामुळे टंचाई आराखडा कागदावरच राहतो.

जिल्हय़ात दरवर्षी प्रशासन टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. यात प्रामुख्याने टँकर, बलगाडीने टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करणे, नादुरुस्त नळपाणी योजनांची दुरुस्ती, विहिरींमधील गाळ काढणे, विधन विहिरींची दुरुस्ती करण्यासोबत नवीन विधन विहिरींची कामे प्रस्तावित करण्यात येतात. मागील दोन वर्षांत रायगड जिल्यात टंचाई कार्यक्रमांतर्गत १ हजार १०१ विधन विहिरींची कामे प्रस्तावित करण्यात आली. यामधील ७४९ कामांना मंजुरी प्राप्त झाली. प्रत्यक्ष २७१ कामे करण्यात आली. यातील ४४ विधन विहिरी अयशस्वी झाल्या.