रायगड जिल्हय़ातील भूजल पातळीत मोठी घट झाल्याची धक्कादायक बाब भूवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे. त्यामुळे मे महिन्यात जिल्हय़ातील अनेक भागांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, पाली, तळा आणि म्हसळा तालुक्यांतील भूजल पातळीत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे.
राज्यातील विविध भागांत भूगर्भातील पाणीसाठय़ाच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण केले जाते. यात गेल्या पाच वर्षांतील भूगर्भातील पाणीसाठय़ाचा अभ्यास केला जातो. पाणीसमस्येचा अचूक अंदाज यावा हा यामागचा मूळ उद्देश असतो. या वर्षी सर्वेक्षणासाठी ५० विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. रायगड जिल्हय़ात भूवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात या वर्षी भूजल पातळीत मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे.
अलिबाग तालुक्यातील गेल्या पाच वर्षांतील सरासरी भूजल पातळी ही मार्च ३.३९ मीटर एवढी असते ती ४.२९ मीटपर्यंत खाली गेली आहे. कर्जत तालुक्यातील सरासरी भूजल पातळी ५.६४ मीटर असते, ती आता ७.१७ मीटपर्यंत खाली गेली आहे. खालापूर तालुक्यातील भूजल पातळी ४.४३ मीटर असते, ती आता ५.६१ मीटर खाली गेली आहे. पेण तालुक्यातील भूजल पातळी ५.०४ मीटर असते, ती ६.४४ मीटर खालावली आहे. सुधागड तालुक्यातील पाण्याची पातळी ६.५४ मीटरवरून ७.६ मीटपर्यंत खालावली आहे. म्हसळा तालुक्यात मार्च महिन्यात भूजल पातळी २.५६ मीटर असते ती आता ६.२१ मीटर खाली गेली आहे. तळा तालुक्यातील भूजल पातळी २.७२ मीटर असते, ती आता ३.८५ मीटर खाली गेली आहे. श्रीवर्धन, रोहा, महाड तालुक्यांतही स्थिर भूजल पातळीत अंशत: घट दिसून आली आहे, तर उरण, मुरुड या तालुक्यांत भूजल पातळीत फारशी घट झाली नाही. गेल्या वर्षी जिल्हय़ात सरासरीच्या साठ ते पासष्ट टक्के पावसाची नोंद झाली होती. म्हणजेच जवळपास १ हजार मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालवत गेली असल्याचे भूवैज्ञानिक डी. एस. येळाले यांनी सांगितले. पाण्याचा अतिप्रमाणात, अर्निबध उपसा हे भूजल पातळी घटण्यामागचे प्रमुख कारण सांगितले जाते. मुंबईला जवळ असलेल्या रायगड जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणावर औद्योगिकीकरण त्यासोबत नागरीकरण झाले आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा प्रचंड वाढला आहे. दुसरीकडे अधिक पाऊस होऊनही ते सर्व समुद्राला जाऊन मिळते. ते अडविण्याच्या दृष्टीने फारसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. पाणीउपसा होत असताना स्रोतांचे पुनर्भरण होत नसल्याने भूजल पातळी घटत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी जलस्वराज्य अभियानांतर्गत जिल्हय़ातील विविध भागांतील विहिरी आणि िवधन विहिरींचे पुनर्भरण हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.