टँकरद्वारे पाणीपुरवठय़ाची योजना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या संभाव्य पाणीपुरवठा आराखडय़ात ८८ गावातील २१७ वाडय़ांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी सुमारे ४५ टँकर लागणार आहेत.

टँकर व्यतिरिक्त विंधनविहिरी आणि नळपाणी योजना दुरुस्तीचाही समावेश आराखडय़ात केला आहे. विंधनविहिरींच्या जागा निश्चितीसाठी भूगर्भतज्ज्ञांचा पाहणी अहवाल वेळेत न मिळाल्याने आराखडय़ाला विलंब झाला. जिल्ह्य़ातील पहिल्या टँकरची मागणी खेड तालुक्यातून झाली आहे. अजूनही जिल्हा परिषदेचा अंतिम टंचाई आराखडा तयार केलेला नाही. पाणीपुरवठा विभागामार्फत आराखडय़ास अंतिम रूप देण्यासाठी धावपळ सुरू आहे.

गतवर्षी फक्त टँकरसाठी निधीची तरतूद केली होती. यावर्षी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या आदेशानुसार त्यात नळ पाणी योजना दुरुस्ती आणि विंधनविहिरी उभारण्याचाही समावेश केला आहे. विंधनविहिरींच्या जागा निश्चित करताना भूगर्भतज्ज्ञांचा अहवाल अत्यावश्यक असतो. जिल्ह्य़ात भूगर्भतज्ज्ञांची वानवा असल्याने व प्रपत्र तयार करताना तालुकास्तरावरून विलंब झाला. आजही अनेक तालुक्यांचे व प्रपत्र गटविकास अधिकाऱ्यांच्या सहीअभावी रखडले. ते तयार करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे.

संभाव्य आराखडय़ामध्ये ९५ नवीन विंधनविहिरी उभारण्यात येणार आहेत. मार्च महिना उजाडला तरीही अद्याप आराखडा मंजूर नाही. अजून दोन दिवसांनी जिल्हाधिकाऱ्यांची सही होईल. त्यानंतर तालुकापातळीवर अंमलबजावणीसाठी आराखडा पाठविला जाईल. त्यातही विंधनविहिरी उभारण्यासाठी लागणारी यंत्रणा अत्यंत अपुरी आहे.

खासगी कंत्राटदार शासकीय कामे करण्यास नकार देतात. गतवर्षी ६० टक्केच विंधनविहिरी उभारण्यात यश आले. यावर्षी उशिराने आराखडा तयार झाल्याने मोठी गैरसोय होणार आहे. नळपाणी योजना दुरुस्तीच्या निविदा काढणे किंवा तांत्रिक मंजुऱ्या घेण्यात महिनाभराचा कालावधी जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करेपर्यंत बराच कालावधी लागणार आहे. त्यात उन्हाळ्याचा कालावधी संपून जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

टंचाई आराखडा तयार करताना भूगर्भतज्ज्ञांचे व प्रपत्र भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्राथमिक आराखडय़ातील प्रत्येक गावनिहाय अहवाल तयार करण्यासाठी भूगर्भतज्ज्ञ उपलब्ध नाही. त्यामुळे तालुकास्तरावरून माहिती उशिरा प्राप्त झाली. अहवालात नमूद केलेल्या विंधनविहिरींची कामे तत्काळ सुरू करण्यात येतील, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी व्यक्त केला.