अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे यंदा विदर्भात सर्वत्र भूजल पातळीत वाढ झाल्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असा प्रशासनाचा दावा असला तरी प्रत्यक्षात गावोगावी पाण्यासाठी होत असलेली नागरिकांची पायपीट, शहरी भागात पाणीपुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरण कार्यालयावर निघत असलेले मोच्रे, कार्यालयातील सामानाची होणारी तोडफोड, टॅंकरने होणारा पाणी पुरवठा आणि पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना इत्यादी बाबी, कोटय़वधीच्या योजनांची मंजुरी लक्षात घेतली तरी पाणीटंचाई कायमच, असा निष्कर्ष काढणे भाग असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
उन्हाळ्यात दरवर्षी भूगर्भातील पाण्याची पातळी खूप खाली जात असल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आणि प्रशासनाच्याही तोंडचे पाणी पळून घशाला कोरड पडत असते. मात्र, यंदा अतिवृष्टी व अवकाळी पाऊस झाल्याने ओढवलेली आपत्ती ही इष्टापत्ती असल्याचे प्रशासनाचे वाटत आहे. राज्यातील अन्य भागांपेक्षा विदर्भात अनेक जलाशयांमध्ये पाण्याची पातळी कमी झालेली नाही. अधिकाऱ्यांच्या मते जलस्तर वाढल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न यंदा भेडसावणार नाही. विदर्भातील नागपूर आणि अमरावती या दोन्ही महसुली विभागात निदान दोन महिने पाणीटंचाई भासणार नाही. त्यानंतर पावसाळाच सुरू होईल.मात्र, तापमानदर्शक यंत्रातील पारा अधिकच वर वर चढायला लागला तर बाष्पीकरणाची प्रक्रिया गतिमान होऊन वाढलेला जलस्तर कमी होऊ शकतो. नागपूर विभागात १७ तलाव आणि धरणांमध्ये ५३ टक्के, तर अमरावती विभागातील धरणात ४६ टक्के जलसाठा असल्याचे वृत्त असून गतवर्षीच्या तुलनेत नागपूर विभागात ३५ टक्के व अमरावती विभागात ३० टक्के जलसाठा असल्याचे सांगण्यात येते.
नागपूर विभागात १८०० दशलक्ष क्युबिक मिटर व अमरावती विभागात १२००० दशलक्ष क्युबिक मीटर पाणी आज उपलब्ध आहे. यवतमाळ जिल्ह्य़ात भूजल पातळीत सरासरीत १.३३ मीटरने वाढ झालेली आहेत. सहा तालुक्यात दीड मिटरपेक्षा जास्त वाढ झालेली आहे.
जिल्ह्य़ाचे पर्जन्यमान ९११.३४ इतके असतांना प्रत्यक्षात १२३३ मि.ली. मीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. कोसळलेला पाऊस जलसंधारणाच्या अनेक प्रयोगांमुळे भूगर्भात साठवला गेला आणि भूजल पातळीत व धरणे आणि तलावात जलस्तर वाढला आहे. जिल्ह्य़ातील १६ तालुक्यांमध्ये १९१ विहिरींचे निरीक्षण केले असता जिल्ह्य़ात सरासरी १.३३ मिटरने भूगर्भातील पाण्यात वाढ झाल्याचे दिसून आले. महागाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २.१० मिटरने वाढ झाली असून सर्वात कमी वाढ झरीजामणी तालुक्यात अर्थात. ०.४९ मीटरने वाढ झाली आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर भूजलपातळीत सरासरीने झालेली ही वाढ मात करण्यास मदत करेल, असा प्रशासनाला विश्वास आहे. उल्लेखनीय म्हणजे, भूजलस्तर वाढला असला तरी प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, वणी, राळेगाव, अशा अनेक तालुक्यांमध्ये पाणी प्रश्न पेटलेला आहे. महिलांचे घागर मोच्रे, दोन तीन किलोमीटरवरून पाणी आणण्यासाठी होणारी पायपीट हे रोजचे दृश्य झाले आहे. यवतमाळ शहरात १० टंॅकरने काही भागाता पाणी पुरवठा सुरू आहे, तर शिवसेनेच्या पराग िपगळे यांच्या नेतृत्वाखाली दोन टॅंकरने पाणी पुरवठा करीत आहे. नगर पालिकेने एका प्रभागात येणाऱ्या चार नगरसेवकांसाठी एका दिवशी प्रत्येकी दोन, याप्रमाणे एकूण आठ फेऱ्या मारण्याचे काम टंॅकरला करावे लागत आहे. शहरातील झाडांना रखरखत्या उन्हात जगवण्यासाठी पाण्याचा टंॅकर तनात करण्यात आला असून आपात स्थितीसाठी एक टॅंकर राखीव ठेवण्यात आला आहे.
‘एसएमएस अलर्ट’
शहरातील पाणीटंचाईबाबत नागरिकांच्या जीवन प्राधिकरणकडे येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता जलपूर्तीसंबंधी एसएमएसव्दारे माहिती देण्याची योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने आखली आहे. ग्राहकांनाही ९३७२१६२७१७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवता येईल. जीवन प्राधिकारणवर येणारे मोच्रे, होणारी तोडफोड लक्षात जनप्रतिनिधींना वॉटर एसएमएस करण्याचा व आपली स्थिती अवगत करण्याचा निर्णय जीवन प्राधिकारणाने घेतला आहे. मध्यंतरी जलवाहिनी फुटल्याने तीन दिवस पाण्यासाठी हाहाकार उडाला होता. जीवन प्राधिकरणाच्याही काही तांत्रिक अडचणी नागरिकांनी समजून घ्याव्या, असे आवाहन जीवन प्राधिकरणाने केले आहे.