ठिबक सिंचनावर आधारित कापूस घेणाऱ्या शेतकऱ्यांचा पेरा सात-बारावर घेण्यासंदर्भात कार्यवाही त्वरित करावी. शेतकऱ्यांसाठी पीकविम्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वपूर्ण आहे, असे सांगून ग्रामीण भागातील पाणीयोजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुरेश धस यांनी दिले.
जिल्हा नियोजन व विकास समितीची बठक धस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जि. प. अध्यक्षा मीना बुधवंत, खासदार संजय जाधव, आमदार सीताराम घनदाट, मीरा रेंगे व बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी एस. पी. सिंह, महापालिका आयुक्त ए. ए. महाजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला, जिल्हा नियोजन अधिकारी ना. गो. पतंगे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री धस म्हणाले की, वादळी वाऱ्यामुळे महावितरणच्या खांबांचे नुकसान झाले. काही ठिकाणी शाळा-खोल्यांवरील पत्रे उडून जाणे या व अन्य स्वरूपाचे नुकसान झाले. मदत व पुनर्वसन विभागामार्फत या साठी त्वरित मदत देण्यात येईल. संबंधित विभागांनी तसे प्रस्ताव त्वरित जिल्हा प्रशासनाकडे पाठवावेत.
कृषी संजीवनी योजनेची कार्यवाही प्रभावीपणे करावी. टंचाई स्थिती उद्भवल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी सर्व विभागांनी सज्ज राहावे. शेततळी अथवा मजुरांकरवी करण्यात येणारी कामे प्राधान्याने हाती घेऊन मजुरांना कामे तातडीने उपलब्ध करावीत, असे निर्देशही धस यांनी दिले.

Story img Loader