अहिल्यानगर : जिल्ह्यात जलजीवन मिशन कार्यक्रमातील पाणीयोजनांची कामे रखडल्याने, या अपूर्ण योजनांमुळे ११३ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. जलजीवन मिशनमधील पाणीयोजना पूर्ण झाल्या असत्या तर या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला नसता. यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या योजना असलेली ७९ गावे तर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या योजना असलेल्या ३४ गावांचा समावेश आहे.

अर्थात सध्या जरी ७२ गावे व ३७५ वाड्यावस्त्यांना ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असला तरी काही गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव नजीकच्या काळात प्राप्त होणार आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत गेल्या चार वर्षांपासून स्वतंत्र व प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात आली आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे शाश्वत व कायमस्वरूपी पाण्याचा उद्भव असतानाही केवळ योजना अपूर्ण राहिल्यामुळे अनेक गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा परिषदेकडील बहुतांशी योजनांचे उद्भव कोरडे पडल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

जिथे पाणी योजना आहे पण त्या योजनेचे उद्भव कोरडे पडले आहेत तसेच पाणी योजना पूर्ण झाली असती तर संबंधित गावाला पाणीटंचाई भासली नसती अशी गावे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने निश्चित केली आहेत. त्यात ११३ गावांचा समावेश आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील गावे अधिक आहेत. सध्या जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार २६१ लोकसंख्येची तहान टँकरद्वारे भागवली जात आहे.
जलजीवन मिशनमधील ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत केली जातात. अशा ११२ प्रादेशिक योजनांची कामे आहेत. त्यासाठी सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र या विभागाकडून अद्याप एकही योजना पूर्ण झालेली नाही.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ५ कोटी रुपयांपेक्षा कमी खर्चाची कामे केली जात आहेत. अशा स्वतंत्र ८३० पाणी योजनांची कामे होत आहेत. त्यासाठी १३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत २६३ पाणी योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. काही योजनांची कामे ७५ टक्केपेक्षा अधिक झाली आहेत. परंतु गेल्या चार ते पाच महिन्यांपासून निधी उपलब्ध न झाल्यामुळे ठेकेदारांनी कामाची गती कमी केली आहे. त्यातून अनेक योजनांची कामे बंद पडली आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील पाणीयोजनांची कामे वेळेत पूर्ण केली असती तर यंदा ७९ गावांना टंचाई भासली नसती. जिल्हा परिषदेकडील पाणीयोजनांचा समावेश असलेली ३४ गावे आहेत. मात्र तिथे उद्भवाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अकोल्यातील ४ योजना कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. कालव्यांना पाणी असेल तर योजना चालू शकतात. कर्जत व जामखेडमध्ये प्रत्येकी चार अशा ८ योजनांचे उद्भव कोरडे पडले आहेत. परिणामी योजनांतून होणारा पाणीपुरवठाही बंद झाला आहे. शेवगावमधून कालव्याचे पाणी मिळाले तर चार योजना चालू शकतात. अहिल्यानगर तालुक्यातील दोन उद्भव कोरडे पडले आहेत, त्यावर तीन योजना अवलंबून आहेत. पारनेरमध्ये चार अपूर्ण योजना उद्भव तलाव व विहिरीवर आहेत. संगमनेरमध्ये दोन पाणी योजनेचे उद्भव कोरडे पडले आहेत.