उन्हाळय़ाची चाहूल लागताच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या टंचाई आराखडय़ानुसार मार्च महिन्यात १४० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार आहे. त्यासाठी २२७ उपाययोजना प्रस्तावित असून १ कोटी ४३ लाख ६ हजार रुपये खर्च होणार आहे. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचा टंचाई आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. यावर्षी सरासरी ११० टक्के पाऊस झाल्याने या जिल्हय़ातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्प तुडूंब भरलेले आहेत. तसेच भूगर्भातील पाण्याच्या पातळीत २ ते ४ मीटरने वाढ झालेली आहे. त्यामुळे यावर्षी पाणी टंचाईची समस्या भेडसावणार नाही असा सर्वाचा अंदाज होता. परंतु ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या जानेवारी ते मार्च या दुसऱ्या टप्प्यातील टंचाई आराखडय़ानुसार मार्च महिन्यात जिल्हय़ातील १४० गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. ही टंचाईची झळ जिल्हय़ातील १५ तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गाव व पाडय़ांना सोसावी लागणार आहे. भद्रावती तालुक्यातील १७ गावांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे तर सिंदेवाही तालुक्यातील १७, ब्रम्हपुरी ५, जिवती व वरोरा तालुक्यातील ४ गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई राहणार आहे. यासोबतच चंद्रपूर, बल्लारपूर, चिमूर, मूल, सावली, गोंडपिंपरी, पोंभूर्णा, राजुरा व कोरपना या तालुक्यातील तीन ते चार गावांना पाणी टंचाईचा फटका सहन करावा लागणार आहे. या टंचाईवर उपाययोजना म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने २२७ उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यावर १ कोटी ४३ लाख ६ हजाराचा खर्च होणार आहे. माणिकगड पहाडावरील जिवती तालुक्यात खालच्या गावांमधून पाणी वरच्या गावात न्यावे लागत असल्याने तिथे दरवर्षी टँंकरव्दारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु यावर्षी माणिकगड पहाडावरील एकाही गावात टँकर प्रस्तावित करण्यात आलेले नाही. त्या ऐवजी नवीन विंधन विहिरी व नवीन कुपनलिका बसविण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. यासोबतच बहुतांश गावात विहिरीचे खोलीकरण व गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. वीज बिलाअभावी बंद असलेल्या किंवा नादुरूस्त असलेल्या नळ योजना विशेष दुरुस्ती करून सुरू करण्यात येत आहे. बहुतांश गावांमध्ये हातपंपाची कामे करण्यात आलेली आहे. तर काही गावात तात्पूरती पुरक नळ योजना सुरू करण्यात आलेली आहे. नदी काठावरील गावांमध्ये झिरे बुडक्या घेण्यात आलेल्या आहेत. यावर्षी पाणी टंचाईची झळ पोहोचू नये म्हणून अतिदुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या वतीने इतर अपारंपरिक उपाय योजना व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची मदत घेण्यात येत आहे. एकूणच गावातील प्रत्येकाला पिण्याचे पाणी मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. मार्च महिन्यासोबतच एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात कडक उन्हाळा राहतो. दरवर्षी या तीन महिन्यातच तीव्र पाणी टंचाईची समस्या भेडसावते. उन्हाळय़ाच्या या तीन महिन्यात मुबलक पाणी मिळावे म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे १ एप्रिल ते ३१ जून पर्यंतचा तिसऱ्या टप्प्यातील टंचाई आराखडा तयार करण्याचे काम आता हाती घेतले आहे. वरिष्ठ भू वैज्ञानिक कार्यालयाने नुकताच ग्रामीण भागातील बहुतांश खेडय़ात जावून तेथील पाण्याची पातळीची तपासणी केली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात भूजल पातळी बऱ्यापैकी दाखवित असली तरी अनेक गावांमध्ये पाण्याची पातळी खोल गेली असल्याने तिथे तातडीची उपाययोजना करता यावी म्हणून उपाययोजना सूचविण्यात आलेल्या आहेत. साधारणत: या तीन महिन्यात पाणी टंचाईची तीव्र झळ सोसावी लागत असल्याने गावकऱ्यांना टंचाईच्या दिवसांमध्ये पाण्याचा जपून वापर करण्याच्या सूचना आतापासून देण्यात आलेल्या आहेत.

Story img Loader