लातूरमध्ये विक्रेत्यांची चंगळ; महापालिकेकडून नळाद्वारे पाणी वितरण बंद करून टँकरने पाणीपुरवठा सुरू
पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असतानाच पाण्याचा साठा करण्यासाठी आवश्यक साहित्याच्या विक्रीलाही लातूर शहरात चांगलाच उठाव आला आहे. प्लास्टिकच्या टाक्या व २०० लिटरच्या बॅरल खरेदीसाठी झुंबड उडत असून दिवसाकाठी तब्बल ५ लाख रुपयांची उलाढाल लातूरमध्ये होत आहे.
महापालिकेने नळाद्वारे पाणी वितरण बंद करून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर पाणी टँकरद्वारे पुरवण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यामुळे प्रत्येकाच्या घरी नव्याने २०० लिटरचे प्लास्टिकचे बॅरल विकत घेतले जात आहे. टँकर आल्यानंतर टँकरजवळ हे बॅरल ठेवावे लागते. त्यात भरलेले पाणी घरी न्यावे लागते. त्यामुळे बॅरलची खरेदी ही अपरिहार्य आहे. ६०० ते ८०० रुपये किमतीला हे बॅरल विकले जात आहे. ५०० ते २ हजार लिटपर्यंत टाक्यांनाही मोठी मागणी आहे. िवधनविहिरी बंद पडत असल्यामुळे व नळाद्वारे पाणी येत नसल्यामुळे घरोघरी पाण्याची साठवणूक वाढवण्याकडे लोकांचा कल आहे. पाण्याचा मोठा टँकर घेतला तर पाणी स्वस्त पडते. त्यामुळे आपापल्या क्षमतेनुसार पाणी साठवणूक वाढवली जात आहे. अपार्टमेंटमध्ये एकत्रित पाण्याचा टँकर खरेदी केला जातो. प्रत्येकास पाणी वाटून दिले जाते. घरात ५०० लिटरची टाकी दारातून जात नाही, त्यामुळे २०० लिटरचा बॅरल ठेवावा लागतो. ठराविक वेळेत पाणी सोडून प्रत्येकास बॅरल भरून घेण्यास सांगितले जाते. त्यानंतर पाणी सोडणे बंद होते. आहे त्या पाण्यात भागवण्याची सवय आता घरोघरी लागू लागली आहे.
पुण्या-मुंबईप्रमाणेच लाफ्टवर ठेवण्यासाठी पाण्याची आडवी टाकी खरेदी केली जात आहे. ५०० लिटर पाणी यात मावते. पाणी साठवणुकीसाठी १ हजार ते २ हजार लिटरच्या टाक्याही खरेदी केल्या जात असून विविध कंपन्यांची रोजची किमान ३ लाख रुपयांची विक्री शहरात होते आहे. ग्रामीण भागात बलगाडीतून शेतातून पाणी आणण्यासाठी १ हजार ते ५०० लिटर टाक्यांची खरेदी होत आहे. रोजच्या विक्रीत ८० टक्के वाटा शहराचा, तर २० टक्के वाटा ग्रामीण भागाचा आहे. पाणी विक्रीचे खासगी टँकरही मोठय़ा प्रमाणावर वाढले असून, ५ हजार लिटरच्या टँकरला ५०० रुपयांऐवजी ८०० रुपये द्यावे लागत आहेत. १५ दिवसांपूर्वी टँकरवाल्यास दूरध्वनी केल्यानंतर दोन तासांत पाणी मिळत असे, आता या साठी दोन दिवस लागत आहेत. गल्लीबोळात मोठे टँकर दिवसा जात नाहीत. त्यासाठी रात्रीची वेळ टँकरवाल्यांकडून सांगितली जाते. रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत टँकरची सेवा सुरूच असते. टँकरवाल्यांकडे आता २४ तास फोनची सुविधा उपलब्ध आहे.
शहरात किमान ३०० खासगी टँकर आहेत. महापालिकेने खासगी बांधकामांवर काहीशी वक्रनजर फिरवल्यामुळे बांधकामांत २५ टक्के घट झाली आहे. त्यामुळे बांधकामाला विकले जाणारे पाणी लोकांना मिळत आहे. टँकरद्वारे मिळणारे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही, हे लोकांना समजत नसल्यामुळे त्याऐवजी २० लिटरचे जार खरेदी करण्याकडे लोकांचा मोठा कल वाढला आहे. अर्थात, असे पाणी विकणारी मंडळीही टँकरनेच पाणी खरेदी करीत असल्यामुळे त्यांनीही आपला भाव वाढवला आहे.
बुधवारपासून २० लिटरच्या पाण्याच्या जारची किंमत ३५ रुपयांवरून ५० रुपये करण्यात आली. शहर परिसरात १०० पेक्षा अधिक बंद जारमधून पाणीविक्री करणारे व्यवसाय सुरू आहेत. टँकरच्या लोखंडी टाक्यांची विक्रीही मोठय़ा प्रमाणावर होत आहे. या बरोबरच १ हजार व ५०० लिटरच्या टाक्या वाहनात ठेवून गल्लीबोळात पाणी विकणाऱ्यांतही वाढ झाली आहे.
अशा वाहनांवर छोटी मोटार असते व यातून पाणी वरच्या टाकीत चढवण्याची व्यवस्थाही असते. दुष्काळात पाण्याची टंचाई आहे. मात्र डिझेल, प्लास्टिक बॅरल, टाक्या व पाणी विक्रेत्यांची चंगळ आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा