रत्नागिरी जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांमध्ये पाणीटंचाईने उग्र सवरूप धारण केले असून तज्ज्ञांच्या अंदाजानुसार मान्सूनच्या पावसाचे आगमन लांबल्यास ग्रामीण भागाबरोबरच काही शहरांमध्येही त्यांच्या झळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुमारे दोन आठवडय़ांपूर्वी जिल्ह्य़ाच्या नऊ तालुक्यांपैकी सात तालुक्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई होती. त्यावेळी मंडणगड आणि रत्नागिरी हे दोन तालुके वगळता अन्य सात तालुक्यांमधील एकूण ४३ गावांच्या ७२ वाडय़ांना या टंचाईचा फटका बसला होता. पण दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असून आता जिल्ह्य़ाच्या सर्व, नऊही तालुक्यांमध्ये गेल्या वर्षांच्या तुलनेत जास्त पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच गेल्या वर्षांच्या तुलनेत टॅंकरच्या फेऱ्यांमध्येही वाढ झाली आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, नऊ तालुक्यांमधील मिळून एकूण ८७ गावांच्या १५७ वाडय़ांना या टंचाईची मोठी झळ बसली आहे. त्यापैकी संगमेश्वर तालुक्यात सर्वात जास्त, २७ गावांच्या ४१ वाडय़ांना या टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याखालोखाल, शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री रामदास कदम आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री रवींद्र वायकर असे दोन मंत्री लाभलेल्या खेड तालुक्यातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या तालुक्यातील २२ गावांच्या ३७ वाडय़ांना पाणीटंचाईचा फटका बसला असून चिपळूण (१० गावे-२१ वाडय़ा), गुहागर (७ गावे-२४ वाडय़ा) व लांजा (७ गावे-१५ वाडय़ा) हेही तालुके पाण्यासाठी तहानलेले आहेत.
या सर्व गाव-वाडय़ांना सध्या १८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवण्यासाठी शासकीय आणि खासगी टॅंकरचा उपयोग केला जात असून त्यातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यंदा प्रथमच पंचायत समित्यांच्या खर्चाने या टॅंकरवर जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यात टॅंकरऐवजी उन्हाळ्यातही पुरेसे पाणी असलेल्या विहिरी अधिग्रहित करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. या विहिरी किंवा कूपनलिकांद्वारे तेथील रहिवाशांची पाण्याची गरज भागवली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ाची पावसाची वार्षिक दीर्घकालीन सरासरी सुमारे ३३०० मिलिमीटर आहे. यंदा त्यापेक्षा तब्बल सुमारे एक हजार मिलिमीटर पाऊस कमी पडला. शिवाय, दरवर्षी दिवाळीपर्यंत अधूनमधून पाऊस पडत राहतो. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होते. गेल्या मोसमात मात्र सप्टेंबरनंतर पाऊस पूर्णपणेच थांबल्याने ही पातळी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सर्वात जास्त खाली गेली आहे. त्यामुळे पाणीटंचाई जास्त तीव्र बनली आहे.
या पाश्र्वभूमीवर शासकीय पातळीवरून विविध उपायांद्वारे पाणीटंचाईचा सामना करण्याचे प्रयत्न सध्या सुरू असले तरी यंदा मान्सूनच्या पावसाचे थोडे उशिरा आगमन होण्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरल्यास ही टंचाई आणखीच वाढण्याची चिन्हे आहेत.