अभूतपूर्व पाणीटंचाईत शिक्षणाचे धडे
गेल्या २५ वर्षांपासून शिक्षणातील पॅटर्नमुळे नावारूपास आलेल्या लातुरात उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी-विद्याíथनी मोठय़ा संख्येने येतात. या वर्षी अभूतपूर्व पाणीटंचाईत ही मुले शिक्षण घेत आहेत. यापूर्वी कधीही अशी पाणीटंचाई अनुभवली नव्हती. पाण्याचा मुक्त वापर करण्याची सवय लागल्यामुळे पाण्याचे महत्त्वच कळत नव्हते. ते लातुरात कळत असल्याचे बहुतांश विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
दयानंद महाविद्यालयातर्फे चालवण्यात येत असलेल्या विद्याíथनी वसतिगृहात तब्बल ५०७ मुली आहेत. राज्यातील १९ जिल्हय़ातून या मुली येथे आल्या आहेत. विदर्भातील वाशीम येथील बारावीत शिकणारी अंतरा आहाडे हिने पाणीटंचाई कधी अनुभवली नव्हती. कपडे धुवायला पाणी नसल्यामुळे साचलेले कपडे गावाकडे पाठवून धुवून आणते, असे अंतरा म्हणाली.
बीसीएसच्या दुसऱ्या वर्षांत शिकणारी सोलापूरची नम्रता बिराजदार म्हणाली की, वसतिगृहात राहण्याची संधी मिळाल्यामुळे किमान बादलीभर पाणी तरी लातुरात मिळते. बाहेर खासगी खोल्या घेऊन राहिलो असतो तर मात्र अडचणीला पारावार उरला नसता , असे तिने सांगितले.
वसतिगृह पर्यवेक्षिका रेणुका महाळंग्रीकर व रेवती जोशी यांनी यापूर्वी पाण्याचा असा ताण कधीच अनुभवला नसल्याचे सांगितले. दररोज ६ हजार लिटरचे चार टँकर विकत घेऊन विहिरीत टाकले जातात. तेथून पिण्याचे पाणी प्रक्रिया करून दिले जाते व उरलेले पाणी वापरण्यास मोजून दिले जाते. दिवसभरात टँकरसाठी किमान २५ फोन करावे लागतात. पाणी वेळेवर उपलब्ध होते-नाही, हाच मोठा ताण मनावर असल्याचे सांगितले. शहरी भागात पाण्याचा ताण सहन करताना ग्रामीण भागात शेतकरी किती उत्पन्न काढत असतील, कसे जगत असतील? याचा अंदाज करता येऊ शकतो, असे त्या म्हणाल्या.
औसा रस्त्यावरील वेदिका वसतिगृहात ६६ मुली वास्तव्यास आहेत. बारावीनंतर सीईटी परीक्षा पुन्हा देण्यास राज्यातून विविध भागातून आलेल्या सुमारे १६ मुली या वसतिगृहात राहतात.
नाशिक येथील नीलम यादव ही या वसतिगृहात राहते. ती मूळची लखनौची. वडील सन्यात असून सध्या नाशकात आहेत. लहानपणापासून नदीच्या सान्निध्यात वावरलेल्या नीलमला लातुरातील पाणी प्रश्नाची तीव्रता जवळून पाहून धक्काच बसला. दैनंदिन वापरात पूर्वीपेक्षा आपण ७५ टक्के पाणी वाचवत असल्याचे ती म्हणाली.
रत्नागिरी जिल्हय़ातील खेड येथील माहेश्वरी नाळे हिच्या गावी बारमाही पाण्याचा सुकाळ असतो. लातूरची पाण्याची स्थिती पाहता असा प्रसंग कोणावरही उद्भवू शकतो याची जाणीव झाली अन् आम्ही आता पाणी जपून वापरत असल्याचे ती म्हणाली. वसतिगृहात मुलींना हात धुण्यासाठी स्वतंत्र बादली दिली जाते व ते पाणी कुंडय़ांसाठी वापरले जाते. फरशी पुसताना त्यात फिनेल न टाकता ते पाणीही कुंडय़ांसाठी वापरत असल्याचे वसतिगृहाच्या संचालिका सुप्रिया सावंत यांनी सांगितले. पाणी टँकरनेच विकत घ्यावे लागते.
केवळ ते विकतचे आहे म्हणून नव्हे, तर एकूणच पाणी जपून वापरण्याचा संस्कार सर्वावर व्हावा, हा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या.
लातूरची ओळख चांगले शिक्षण देणारे गाव म्हणून आहे. पाणीटंचाईमुळे ही ओळख पुसणार नाही याची काळजी लातूरकरांनी घेतली पाहिजे व पाणी जमिनीत मुरवणे, पाण्याचा वापर कमी करणे, पाणी वाया न घालवणे अशा उपाययोजना करीत शिक्षणाचा वसा जपला पाहिजे, असे बहुतांश विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ही ओळख संपली तर लातूर हे राज्याच्या नकाशावर आहे हेही महाराष्ट्र विसरून जाईल, असे त्या म्हणाल्या.
व्यथा काय?
* या वर्षी दोन महिन्यांपासून पाणीटंचाईची तीव्रता वाढल्यामुळे वसतिगृहात मुलींना पाणी मोजून दिले जाते. पिण्याच्या पाण्याची चांगली सोय आहे. पण वापरण्याचे पाणी काटकसरीने वापरले जावे या साठी शौचालय व स्नानगृहातील नळ बंद करण्यात आले आहेत.
* दररोज ६ हजार लिटरचे चार टँकर विकत घेऊन विहिरीत टाकले जातात. तेथून पिण्याचे पाणी प्रक्रिया करून दिले जाते व उरलेले पाणी वापरण्यास मोजून दिले जाते. दिवसभरात टँकरसाठी किमान २५ फोन करावे लागतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा