रविवारी पहाटेपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून दुपारनंतर मात्र जोर ओसरला आहे. संततधार पावसामुळे वारणा नदी पात्रातील पाणी पात्राबाहेरील शेतात शिरत असून शिराळा तालुक्यातील मांगले-सावर्डे पूल पाण्याखाली गेला आहे. चांदोली धरणातील पाणीसाठा ७० टक्क्यापर्यंत पोहचला असून कोयनेतही पाणीसाठ्यात गतीने वाढ होत आहे.
शनिवारी सायंकाळपासून ओसरलेला पावसाचा जोर मध्यरात्रीनंतर पुन्हा वाढला आहे. पहाटेपासून दुपारपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. यामुळे रस्त्यावरील वर्दळ अत्यल्प झाली असून शहरातील सर्वच रस्ते राडेराड झाले आहेत. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने खड्डे चुकवितांना वाहनधारकांची तारांबळ उडत आहे.
हेही वाचा >>> अजित पवारांकडून बंडखोर आमदारांवर निधीवर्षाव, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “केवळ त्यांच्याबरोबर…”
जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाउस कोसळत असल्याने वारणा नदीने आपली सीमा ओलांडून आजूबाजूच्या शेतात विस्तार केला आहे. मांगले-सावर्डे पूलावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. तर खोची बंधाराही दोन दिवसापासून पाण्याखाली गेला आहे. वारणेला आलेल्या पुरामुळे सांगलीजवळ हरिपूर संगमावर वारणा-कृष्णेचे विस्तीर्ण पात्र जलाशयाने भरलेले दिसत आहे. संगमावरील पूर पाहण्यासाठी सांगलीकरांनी आज रविवारी मोठी गर्दी केली होती. गेल्या २४ तासात चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ९६ मिलीमीटर पाउस झाला असून पाणीसाठा आज सकाळी आठ वाजता ६९ टक्के झाला होता. शिराळा तालुक्यातील चरण मंडलामध्ये सर्वाधिक ६४.५ मिलीमीटर पाउस झाला असून तालुक्यात सरासरी ४२.९ मिलीमीटर पाउस झाला. जत, आटपाडी वगळता सर्वच तालुक्यात कमी अधिक पाउस सुरू असून जिल्ह्यात सरासरी १३.२ मिलीमीटर पाउस झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.