‘‘मराठवाडय़ात माणसांना आणि जनावरांना प्यायला पाणी नसताना वरून पाणी न सोडणं हे माणुसकीच्या विरोधी आहे. पुणे, नाशिक, नगर जिल्ह्य़ातील लोकांना माझी विनंती आहे अशी भूमिका घेऊ नका. महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे,’’ अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मराठवाडय़ाला पाणी सोडण्याचे आवाहन केले. त्याच वेळी ‘निवडणुकीत किंमत मोजावी लागली तरी मराठवाडय़ाला पाणी सोडा’ असे सांगत मुख्यमंत्र्यांना याबाबत धाडसी निर्णय घेण्याचा सल्लाही दिला.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमानिमित्त पवार पुण्यात बोलत होते. नाशिक व नगर जिल्ह्य़ातील नेत्यांनी खाली पाणी न सोडण्याची भूमिका घेतल्याच्या पाश्र्वभूमीवर पवार यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. ते म्हणाले, ‘‘राज्यावर, विशेषत: मराठवाडय़ावर सध्या दुष्काळाचे संकट आहे. शेतीसाठी पाणी नाहीच, पण आता माणसं व जनावरांना पिण्यासाठीसुद्धा पाणी नाही. अशा वेळी वरून पाणी सोडावं लागतं. ते न सोडणं हे माणुकीच्याविरोधी आहे. आपल्याकडे एक तीळ सातजणांनी वाटून खाण्याची परंपरा आहे. मी सर्वाना विनंती करतो, पुणे, नाशिक, नगर जिल्ह्य़ातील लोकांनी अशी भूमिका घेऊ नये. महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी पाणी सोडणे आवश्यक आहे.’’
याच वेळी पवार यांनी मुख्यमंत्र्यांनाही याबाबत धाडसी निर्णय घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘‘राजकारणात असा प्रसंग आला तर धाडसाने निर्णय घ्यावा लागतो. येत्या निवडणुकीत त्याची किंमत द्यावी लागली तरी देऊ, पण लोकांना पाणी देऊ शकलो नाही ही वेळ येता कामा नये.’’
याच वेळी पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांकडून होणारा पाण्याचा वापर वाढला असल्याचे दाखले दिले. विजेच्या जास्त वापरामुळे पाणी जास्त प्रमाणात उपसले जात आहे, त्यामुळे पाण्याची पातळी खाली जाणाऱ्या प्रदेशांमध्ये महाराष्ट्राचा वरचा क्रमांक लागतो. त्यामुळे पाण्याचा कसा वापर व्हावा, याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Nov 2012 रोजी प्रकाशित
राजकीय किंमत मोजावी लागली तरी मराठवाडय़ाला पाणी सोडा!
‘‘मराठवाडय़ात माणसांना आणि जनावरांना प्यायला पाणी नसताना वरून पाणी न सोडणं हे माणुसकीच्या विरोधी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 10-11-2012 at 05:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply give to marathwada at any cost