उन्हाळय़ाच्या सुरुवातीलाच नगर शहरात पाण्याची बोंब सुरू झाली आहे. शहराच्या बऱ्याचशा भागांत दिवसाआड व तोही अपुरा पाणीपुरवठा सुरू आहे. ही अघोषित पाणीकपातच आहे, मात्र त्यामुळेच याविषयी विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. महानगरपालिका मुळा धरणातून दररोज तब्बल ७ कोटी लीटर पाणी उचलते. शहराची लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येकाला दररोज दीडशे लीटर पाणी मिळाले पाहिजे. मात्र निम्म्या शहरालाच ते मिळते. मग निम्मे पाणी जाते कुठे, हाच मुख्य प्रश्न आहे.
या पंधरा दिवसांत उन्हाळा बऱ्यापैकी जाणवू लागला. मात्र शहराच्या बऱ्याचशा भागांत गेल्या अनेक दिवसांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात अजूनही पुरेसा पाणीसाठा शिल्लक असताना उन्हाळय़ाच्या सुरुवातीलाच शहरात पाण्याची बोंब सुरू आहे. अशा वेळी मनपा नेहमीच वीजपुरवठय़ाकडे बोट दाखवून हात वर करते. खंडित वीजपुरवठय़ामुळे पाणीउपशात सातत्याने व्यत्यय येतो, त्यामुळे नागरिकांना नियमितपणे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करता येत नाही, असे कारण सांगितले जाते. मात्र माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीमुळे यातील फोलपणाच उघड झाला आहे. पाटबंधारे खात्यातील निवृत्त कार्यकारी अभियंता जयप्रकाश संचेती यांनी याबाबत माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीमुळे ही बाब पुढे आली आहे.
पाटबंधारे खात्याच्या बिल आकारणीवरूनच ही बाब स्पष्ट झाली. मुळा धरणावरील पाणीयोजनेतून उचलल्या जाणाऱ्या पाण्याचे पैसे मनपाला पाटबंधारे खात्याला द्यावे लागतात. मनपा दर महिन्याला साधारणपणे ७३.४५८ दशलक्ष घनफूट (२ अब्ज १० कोटी लिटर) पाणी मुळा धरणातून उचलते. म्हणजेच दिवसाला ७ कोटी लीटर पाणी उचलले जाते. हे प्रमाण लक्षात घेता शहरात पाण्याची बोंब होण्याचे काही कारणच नाही. मनपाच्याच आकडेवारीनुसार शहराची लोकसंख्या ४ लाख ७५ आहे. त्याच्याशी तुलना करता दररोज ७ कोटी लीटर म्हणजे हे प्रमाण माणशी दररोज १५० लीटर आहे, ते पाणीवापराच्या जागतिक प्रमाणाशी सुसंगत आहे. असे असताना शहराच्या मोठय़ा भागात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ का येते, हा संशोधनाचा भाग बनला आहे.
शहराच्या पाणीयोजनेवर सात ग्रामपंचायती व शहरातील लष्करी वसाहतीचाही समावेश आहे. ही सगळी मिळून लोकसंख्या ४ लाख ७५ हजार आहे. शहरात अर्धा इंची घरगुती ४२ हजार ५९४  व व्यापारी ५८६ नळजोडण्या आहेत. पाऊण इंची घरगुती २४९ व व्यापारी ११९ नळजोडण्या आहेत. एक इंची प्रकारात घरगुती जोडण्या नाहीत, व्यापारी जोडण्या अवघ्या १४ आहेत. याशिवाय मनपा ७४ ग्राहकांना मीटरने पाणीपुरवठा करते. या नळजोडण्या १ इंचीपेक्षा अधिक व्यासाच्या जलवाहिनीच्या आहेत. मात्र यात प्रामुख्याने विविध सरकारी आस्थापनांचाच समावेश आहे. शहरात मोठय़ा संख्येने असणारी तारांकित किंवा प्रवासी हॉटेल, मोठी रुग्णालये व अन्य व्यावसायिक वापराच्या एकाही ग्राहकाचा यातही समावेश नाही की व्यापारी गटातही समावेश नाही. ही मोठी रुग्णालये व हॉटेलही घरगुती अर्धा इंची नळजोडणीवरच सुरू असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते, हीच बाब पाणी वितरण व्यवस्थेबाबत विविध शंका उपस्थित करणारी आहे. याचाच अर्थ बहुसंख्य व्यापारी ग्राहकांनाही मनपा घरगुती दरानेच पाणीपुरवठा करीत असून, सर्वसामान्य नागरिकांवर हा अन्याय आहे.
मनपाचे पाण्याचे दर लक्षात घेता वर्षांला पाणीपट्टीपोटी शहरात २४ ते २५ कोटी रुपये वसूल होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात ६ ते ७ कोटी रुपयांपेक्षा अधिक पाणीपट्टी मनपा वसूल करूच शकत नाही. मनपाला सध्या पाण्याचे १ कोटी १४ लाख रुपये पाटबंधारे विभागाला देणे आहे. त्यातील प्रत्यक्ष पाण्याचे अवघे ६३ लाख रुपये असून ३१ लाख रुपये दंडाचे व ६ लाख रुपये विलंब शुल्क आहे. या आकडेवारीवरून मनपाच्या वसुलीतील भोंगळपणाही उघड होतो.

Story img Loader