पाण्याची टाकी कोसळल्याने परिणामी शेजारील भिंतही पडल्याने त्याखाली दबून चार जण जागीच ठार, तर पाच गंभीर जखमी झाल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील तळोदे तालुक्यात घडली.
मोरवड (रंजनपूर) येथे महाशिवरात्रीला गुलाम महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रात्री आरतीचा कार्यक्रम होत असतो. गुलाम महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आदिवासींना व्यसनमुक्तीचा धडा देऊन आरती संप्रदाय निर्माण केला. महाशिवरात्रीला हजारो आदिवासी आरती पूजनासाठी एकत्र आलेले असताना जेवणानंतर पाणी पिण्यासाठी जमिनीलगत बांधलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गेले असता प्रमाणापेक्षा अधिक पाण्याच्या दाबाने टाकी कोसळली. त्यामुळे शेजारची भिंतही कोसळली. या दुर्घटनेत सुभाष सोनवणे (५५), त्यांचा मुलगा रवींद्र सोनवणे (७) दोघे रा. लोणेवाडी, ता. चांदवड (नाशिक), राहुल पाडवी (३५) रा. जामली, ता. अक्कलकुवा, अमरसिंग वसावे (४५), रा. बिजरी पाटी, ता. अक्कलकुवा हे जागीच ठार झाले. जखमींमध्ये हुन्या वेस्ता वळवी (५५) रा. वरखेडी, ता. धडगाव, गंगाराम गाजरे (४०), रा. बडबडा (रा. मध्य प्रदेश), संदीप वसावे (२६), बील जामली, ता. नंदुरबार, गौतम बिजगाव (१९), रवींद्र अरविंद ठाकरे (३५), बोरद, ता. तळोदा यांचा समावेश आहे. जखमींवर तळोदा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Story img Loader