हर्षद कशाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग : मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली भाऊचा धक्का ते मांडवा ‘वॉटर टॅक्सी’ प्रवासी मिळत नसल्याने बंद पडली आहे. आता शनिवार, रविवारी बेलापूर ते मांडवा दरम्यान ही वॉटर टॅक्सी सेवा चालवली जाणार आहे. जा-ये करण्याकरिता होणारा त्रास आणि प्रवाशांना उपलब्ध असलेली किफायतशीर पर्याय यामुळे ही सेवा बंद करण्याची वेळ आली आहे.

मुंबईतील गेट वे ऑफ ते अलिबागमधील मांडवा दरम्यान जलप्रवासी वाहतूक चालवली जाते. दररोज या मार्गावरून सरासरी साडेतीन ते चार हजार प्रवाशांची वाहतूक होते. सुट्टीच्या दिवशी आणि शनिवार रविवारी ही संख्या सरासरी दहा हजारापर्यंत वाढते. या मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन भाऊचा धक्का ते मांडवादरम्यान रो रो सेवा सुरू करण्यात आली. ज्यातून वाहनांची ने-आण सुरू झाली. या जलवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भाऊचा धक्का ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली. मात्र उद्घाटनानंतर महिन्याभरातच ही सेवा बंद पडली. प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा’दरम्यान तीन कंपन्यांकडून जलवाहतूक सेवा सध्या पुरवली जाते. या कंपन्या मांडवा ते अलिबाग दरम्यान प्रवाशांना मोफत बससेवा पुरवितात. गेट वे ऑफ इंडिया येथून चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी किफायतशीर बेस्ट सेवा आणि टॅक्सी सेवा मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे प्रवाशांना या जलवाहतूक सेवा किफायतशीर आणि सोयीस्कर पडतात.

नयनतारा कंपनीने सुरू केलेल्या वॉटर टॅक्सीला मांडवा ते अलिबाग दरम्यान मोफत बससेवेचा पर्याय उपलब्ध नव्हता. दुसरीकडे भाऊचा धक्का येथे बेस्टची बससेवा आणि टॅक्सी सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हती. मध्य रेल्वे मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी भाऊचा धक्का हे ठिकाण गैरसोयीचे ठरत होते. सुरुवातीला वॉटर टॅक्सी सेवेचे दर हे इतर कंपन्यांकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवेपेक्षा चढे होते. नंतर ते कमी करण्यात आले. मात्र तरीही प्रवासी संख्या न वाढल्याने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता बेलापूर ते मांडवा दरम्यान शनिवार, रविवारी वॉटर टॅक्सीसेवा चालविली जाणार आहे. मात्र मांडवा ते अलिबाग दरम्यानच्या कनेक्टीव्हीटीचा प्रश्न अजूनही कायम आहे. त्यामुळे मार्ग बदलला तरी प्रवासी संख्या अपेक्षित प्रमाणात वाढेल की नाही याबाबत साशंकता आहे. यासाठी बेलापूरहून मांडव्याला येणाऱ्या प्रवाशांची मांडवा ते अलिबाग प्रवासाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. वॉटर टॅक्सीचे सुरुवातीचे दर ४०० ते ४५० होते, नंतर २५० ते ३५० करण्यात आले. याच वेळी इतर जलप्रवासी वाहतूक कंपन्या मांडवा ते गेट वे दरम्यान १५० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत आहेत. या कंपन्या मांडवा ते अलिबागदरम्यान मोफत बस सेवाही पुरवितात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water taxi awaiting response passengers trouble maritime transport ysh
Show comments