सातारा – भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २५ ते ३० जुलै अखेर सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा रेड व ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील लिंगमळा व भिलार धबधबा तसेच सर्व पर्यटनाचे पॉइंट, पाटण तालुक्यातील ओझर्ड (नवजा) व सडावाघापूर धबधबा, सातारा तालुक्यातील ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबे व कास तलाव तसेच जावली तालुक्यातील ऐकीव या धबधब्यांच्या ठिकाणी विशेषतः मान्सून कालावधीत वर्षाविहारासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. सदर ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये व जीवित व वित्तहानी होऊ नये या करिता सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारा जिल्ह्यातील वरील धबधबे व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी तात्पुरते स्वरुपात बंद ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा जितेंद्र डुडी, यांनी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील लिंगमळा व भिलार धबधबा तसेच सर्व पर्यटनाचे पॉईंट, पाटण तालुक्यातील ओझर्डे (नवजा) व सडावाघापूर धबधबा, सातारा तालुक्यातील ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबे व कास तलाव तसेच जावली तालुक्यातील ऐकीव ही धबधब्याची ठिकाणे आणि सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरते बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
सदर धबधब्यांच्या, पर्यटन स्थळांच्या ठिकाणी अतिवृष्टीच्या कालावधीत पर्यटकांना दि. २८ पर्यंत जाण्यास तात्पुरत्या स्वरुपात बंदी घालण्यात आली आहे. पोलीस विभागाने सातारा जिल्ह्यातील वरील धबधब्यांच्या, पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जाणारे मार्ग, रस्ते बंद करावेत. पोलीस विभाग व संबंधित गावातील वन हक्क समितीने धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक जाणार नाहीत तसेच सदर ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, याबाबत दक्षता घेण्याचे सूचित केले आहे. पर्यटन स्थळी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त नेमण्यात यावा व आवश्यक त्या ठिकाणी पेट्रोलिंग करावे. पोलीस बंदोबस्तासाठी आवश्यकतेनुसार होमगार्ड विभागाची मदत घेण्यात यावी. आवश्यकता भासल्यास नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध आवश्यक ती कठोर कारवाई करावी. मोठ्या प्रमाणावर जाहीर प्रसिद्धी देण्यात यावी. संबंधित कार्यकारी दंडाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांनी स्वतंत्र प्रतिबंधात्मक आदेश पारित करुन त्याची अंमलबजावणी करावी, सदरकामी पोलीस विभाग, महसूल विभाग, वन विभाग, ग्रामविकास विभाग व नगरपालिका विभागांनी संयुक्तरित्या उक्त आदेशाची अमंलबजावणी तात्काळ करण्याचेही आदेशित करण्यात आले आहे.