अलिबाग : रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील रोहन पाटील या तरुण शेतकऱ्यांने पिकवलेली कलिंगडे दुबईला निघाली आहेत. पहिल्या टप्प्यात ४० टन कलिंगड दुबईत पाठवली जाणार आहेत. दुबईत सुप्रित जातीच्या कंलिंगडांना दुबईत मोठी मागणी असते. हीबाब लक्षात घेऊन रोहन साळवी या तरुणांने २० एकर क्षेत्रावर कलिंगडांची लागवड केली सेंद्रिय खते आणि आधुनिक पध्दतीचा वापर केल्याने अवघ्या साठ दिवसांत इतके दर्जेदार उत्पादन मिळाले की या मालाला थेट परदेशातून मागणी होऊ लागली आहे.
रायगडच्या दक्षिण भागातील माणगाव, तळा, महाड परीसरात कलिंगडाची लागवड या हंगामात मोठया प्रमाणात केली जाते. पूर्वी उत्तर रायगडमधील पेण, पनवेल भागातील शेतकरी दक्षिणेत येवून तेथील जमीन भाडेपटटयावर घेवून कलिंगडाची लागवड करीत. परंतु आपणच ही शेती केली तर आपल्याला त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते हे इथल्या तरूण पिढीच्या लक्षात आले आणि नवीन पिढी कलिंगडाच्या शेतीकडे वळत असल्याचे दिसून येते.
वाणिज्य शाखेतून पदवीधर झालेला रोहन मागील काही वर्षांपासून शेतीकडे वळला. त्यात त्याची गोडी वाढली. आणि आता प्रगतीशील शेतकरी म्हणून नावारूपाला येत आहे. नोकरी करून मर्यादीत उत्पन्नावर अवलंबून राहण्यापेक्षा शेतीतून दरवर्षी चांगले उत्पन्न मिळते. शिवाय कुटुंबातील माणसेदेखील या शेतात राबतात. महत्वाचे म्हणजे या शेतीमुळे परीसरातील ५० ते ६० अकुशल कामगारांना सहा महिने चांगला रोजगार उपलब्ध होत आहे. जवळपास वीस एकर इतक्या माळरानावर रोहन साळवी याने आठ प्रकारच्या कलिंगडाची लागवड केली आहे. कालव्याचे पाणी बंद झाल्याने उन्हाळ्यात येणारे भाताचे पीक संपुष्टात आले. त्यामुळे रोहनने कलींगडाचा पर्याय स्वीकारून यंदा त्याचे भरघोस पीक घेतले. यात सुप्रीत, गोल्डन, अगस्ता, सिंबा अशा आठ विविध जातीच्या कलींगडांचा समावेश आहे. यातील सुप्रीत जातीच्या कलींगडांना दुबईत मोठी मागणी आहे.
सध्या कलींगडे काढणीला आली असून हे काम सुरू आहे. मोठे व्यापारी थेट शेतात येवून कलींगडे खरेदी करीत आहेत. त्याला चांगला दर मिळतो आहे. वाहतूकीचा खर्च वाचतो आहे, दलाली द्यावी लागत नाही. त्यामुळे दुहेरी फायदा होत असल्याचे रोहन सांगतो. रोहनने याने शेतावर सोलर पॅनल बसवले आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या वीजेवर पंप चालवून नदीचे पाणी या शेतीसाठी वापरतो. परीणामी त्याला शेतावर वीजजोडणी घ्यावी लागली नाही. कोकणातील बहुतांशी शेतकरी दोन्ही हंगामात भातशेती वरतीच अवलंबून राहतात मात्र आता नव्या पिढीने कात टाकत आधुनिक शेतीची कास धरल्याने कमी वेळात दर्जेदार पिकांचे उत्पादन घेतल्याने थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे दरवाजे खुले झाले आहेत.
परदेशात जाणाऱ्या कलिंगडाचे वजन साधारण साडेतीन चार किलो पासून १२ ते १५ किलो पर्यंत आहे. पूर्ण तयार होण्याच्या साधारण ८ दिवस आधी त्यांची काढणी केली जाते. म्हणजे परदेशात जाईपर्यंत पुढील आठ दिवसात ती पूर्ण तयार होतात. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून जेएनपीटी बंदरातून ही कलींगडे परदेशी जातात. गेल्या वर्षी दुबईसह, मस्कत, ओमान, हॉंगकॉंग या देशात कलिंगडे पाठवण्यात आली होती.
आज आम्ही ४० टन मालाची उचल केली आहे. यातील सुप्रीत जातीच्या कलिंगडांना दुबईमध्ये मोठी मागणी आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधून ही कलिंगडे कंटेनरमधून दुबईला पाठवली जातील. थेट बांधावर खरेदी होत असल्याने शेतकरी देखील समाधानी आहेत. – जयदेव वावेकर, व्यापारी
कोकणातील तरूण शेतीपासून दुरावला आहे. परंतु नोकरीच्या मागे न लागता जर शेतीत मनापासून काम केले तर नोकरीपेक्षा चांगले उत्पन्न मिळते. महत्वाचे म्हणजे आपला आत्मसन्मान ठेवण्याचे काम आज शेतीमधूनच होवू शकते. – रोहन साळवी, तरूण शेतकरी