प्रसेनजीत इंगळे
वसई-विरारमधील खासगी रुग्णालयांत स्थानिक प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता कोविड रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयात कोणत्याही सुविधा नसल्याची बाबही यात उघड झाली आहे. यात उपचारांनंतर खासगी रुग्णालय व्यवस्थापन रुग्णांच्या नातेवाईकांकडून लाखो रुपयांची देयके वसूल करीत आहेत. यावर वसई-विरार पालिकेचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
करोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात पालिकेने केवळ रिद्धिविनायक, विजय वल्लभ, विनायका, स्टार, गॅलेक्सी, प्लॅटिनम, जनसेवा, बदर आणि गोल्डन पार्क ही रुग्णालये उपचारांच्या सुविधेसाठी अधिग्रहित केली होती. या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रकही पालिकेच्या वतीने काढण्यात आले. मात्र, पालिकेची कोणतीही लेखी परवानगी न घेता सध्या डझनभरहून अधिक रुग्णालये कोविड उपचार करीत आहेत.
आरंभीस शहरात करोना उपचार करणाऱ्या रुग्णालयांकडून रुग्णाच्या नातेवाईकांच्या हाती लाखो रुपयांची देयके ठेवली होती. पालिकेने अधिग्रहित केलेल्या खासगी रुग्णालयाच्या या नफ्याच्या वार्ता कानी पडताच इतर खासगी रुग्णालयांनीही तोच कित्ता गिरविण्यास सुरुवात केली आहे. यात १५ हून अधिक रुग्णालये करोना उपचार करण्यास सुरुवात केली आहे. यासाठीच्या परवानग्या घेण्यात आलेल्या नाहीत.
शहरातील १५ रुग्णालयांमध्ये कोविड उपचारांसाठी कोणतीही यंत्रणा नाही. यासाठीचे नियम डावलून हे उपचार केले जात आहेत. यात तीव्र लक्षणे नसलेल्या वा लक्षणे नसलेल्या रुग्णांना काही खासगी दवाखान्यातही उपचार केले जात असल्याचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
वसई-विरार महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तबस्सुम काझी यांना याबाबत विचारले असता इतर कोणतीही आवश्यक परवानगीची तरतूद नाही आहे. परंतु उपचारांदरम्यान बाधितांची माहिती पालिकेला देणे बंधनकारक आहे. तसेच उपचार करत असलेल्या रुग्णालयात स्वतंत्र अलगीकरण कक्ष असणे आवश्यक आहे. त्यामुळे इतर रुग्णांना त्याची लागण होणार नाही अथवा वेगळे प्रवेशद्वार असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतर वैद्यकीय यंत्रणा असणे आवश्यक असल्याचे सांगितले.
साधारण उपचार, देयक दोन लाखांचे
नालासोपारा येथील विजयालक्ष्मी रुग्णालयात सदानंद कोविपाका यांच्यावर करण्यात आलेल्या करोना उपचारांचा खर्च दोन लाखांहून अधिक झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. अवाजवी देयकावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केली आहे. यासंदर्भात रुग्णालयाच्या डॉ. विद्या सामंत यांनी करोना उपचारांसाठी पालिकेकडून परवानगी घेण्यात आली आहे. आम्ही केवळ साधारण लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करीत आहोत, असे सांगितले. यावर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. विजयालक्ष्मी रुग्णालयात करोनावरील साधारण उपचार करण्यात येत असतील तर मग इतका अवाढव्य रकमेचे देयक रुग्णांना का दिले जाते, असा सवाल करण्यात आला आहे. दरम्यान, विजयालक्ष्मी रुग्णालयासंदर्भात पालिकेकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
सरसकट कोणत्याही रुग्णालयाला कोविड उपचार करता येत नाहीत. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी बंधनकारक आहे. कारण कोविड उपचारांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा रुग्णालयाकडे असणे आवश्यक आहे, याशिवाय रुग्णांची माहिती आणि इतर नियमही शासनाने घालून दिले आहेत. यामुळे परवानगी अनिवार्य आहे.
-डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी