औरंगाबादचे शिवसेनेचे(ठाकरे गट) माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरे यांचे पुत्र माजी नगरसेवक आणि युवासेनेचे पदाधिकारी ऋषिकेश खैरे हे एका ऑडिओ क्लिप प्रकरणावरून वादात सापडले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदली करून देण्यासाठी एक व्यक्तीकडून त्यांनी दोन लाख रुपये घेतल्याचे या ऑडिओ क्लिपमधून उघड होत आहे. मात्र संबंधित व्यक्तीचे काम न झाल्याने तो व्यक्ती आता ऋषिकेश खैरेंकडे पैसे परत करण्याची मागणी करत आहे. या प्रकरणावरून आता भाजपा आणि शिंदे गटाने चंद्रकांत खैरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू केली आहे. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
“वाझे ते खैरे हीच खरी महाविकास आघाडीची ओळख आहे. सचिन वाझेंपासून चंद्रकांत खैरेंच्या मुलापर्यंत ज्या पद्धतीने पैशांची लुटालुट या राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली, त्यावरून महाविकास आघाडी सरकार म्हणजे एका अर्थाने वसुलीचं सरकार होतं, हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे.” अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.
हेही वाचा – “बाप जैसा बेटा, भरलो जल्दी लोटा…” ऑडिओक्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचा चंद्रकांत खैरेंवर निशाणा!
याचबरोबर, “देवेंद्र फडणवीस यांना काल सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? जमत नसेल तर राजीनामा द्या. अहो सुप्रिया सुळे महाविकास आघाडीमध्ये गृहमंत्र्यांना तुरुंगात जावं लागलं. काय पद्धतीची खंडणी वसूली सुरू होती. याची उदाहरणं कालही खैरेंच्या मुलाच्या रुपाने पुढे आली.” असंही उपाध्ये म्हणाले आहेत.
याशिवाय, “अगोदर आपल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काय चालत होतं, याचा विचार करा आणि मग या सरकारवर बोला. या सरकारमध्ये जनतेच्या सेवेसाठी देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. सगळ्या चुकीच्या गोष्टी ते मोडून काढत आहेत. पण पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय, महाविकास आघाडी म्हणजे वाझे ते खैरे हा खंडणी वसूलीचा प्रवास.” असं म्हणत केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे