आठ महिन्यांपूर्वी राज्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली. यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर एकनाथ शिंदेंनी ४० आमदार आणि अपक्षांसह भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळचा दुसारा विस्तार न झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘प्रहार’ संघटनेचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनीही मंत्रिमंडळ विस्तारावरून वेळोवेळी जाहीररित्या रोखठोक भूमिका मांडली आहे. त्यातच आता बच्चू कडूंनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान केलं आहे. आम्हालाही मुख्यमंत्री व्हायचं आहे, अशी इच्छा बच्चू कडूंनी व्यक्त केली आहे. त्यांच्या विधानानंतर राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे.
हेही वाचा : “ज्यांना आपल्या मतदारसंघात साध्या मुताऱ्या…”, संभाजी पाटील निलंगेकरांनी अमित देशमुखांना डिवचलं
काय म्हणाले बच्चू कडू?
एका कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू म्हणाले, “प्रहार हा आपल्या अमरावतीवाल्यांचा पक्ष आहे, हा काही दिल्ली-मुंबईवाला पक्ष थोडी आहे. आपल्या मातीतला पक्ष आहे. लोकं म्हणतात आम्ही गद्दारी केली. आम्ही कशाची गद्दारी केली, आमचा स्वतंत्र पक्ष आहे. तुम्ही जर मुख्यमंत्री होत आहात, तर आम्हाला सुद्धा मुख्यमंत्री व्हायचं आहे. आमचं पण राजकारण आहे, आम्ही सुद्धा तसं करु शकतो,” असं बच्चू कडूंनी सांगितलं.
हेही वाचा : “उद्धव ठाकरे हे संधीसाधू, ते स्वत: भाजपाच्या मदतीने निवडून आले अन्…”; राधाकृष्ण विखे-पाटलांचं टीकास्र!
“तुम्ही गद्दारी केली, डाकूंबरोबर गेलात”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बच्चू कडू धाराशिवच्या दौऱ्यावर होते. तेव्हा एका ८० वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याने बच्चू कडूंना घेरत चांगलंचं सुनावलं. ‘ज्यासाठी तुम्हाला निवडून दिलं, ते आपण करत नाही. तुम्ही गद्दारी केली आणि डाकूंबरोबर गेलात,’ असं म्हणत शेतकऱ्याने बच्चू कडूंची गाडी आडवली होती.