सत्ताधारी शिवसेना-भाजपमधील कुरघोडीचा संघर्ष आता विकोपाला गेला असून भाजपवर शरसंधान करण्याची कोणतीही संधी शिवसेना नेते सोडताना दिसत नाहीत. आम्ही सत्तेत आहोत पण सरकार आमचे नसल्याचे वक्तव्य शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केले. लातूरच्या नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. शिवसेना पक्ष सत्तेत असला तरी शासनाच्या निर्णय प्रक्रियेत शिवसेनेचा कोणताही सहभाग नसून हे सरकार आमचे नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले. गरीबीला कंटाळून लातूरमधील मूलीने आत्महत्या केल्याच्या प्रकरणावरून राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. राज्याच्या प्रशासनावर मुख्यमंत्र्यांचा वचक असायला हवा, अशाप्रकारच्या घटना राज्याची वाटचाल अधोगतीकडे होत असल्याचे द्योतक असल्याचे संजय राऊत म्हणाले.
लातूरच्या स्वाती पिटलेने बसच्या पासअभावी आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. दरम्यान, अवघ्या २६० रुपयांच्या पासअभावी आत्महत्या केलेल्या स्वाती पिटलेच्या कुटुंबियांना राऊत यांनी ५० हजार रुपयांची मदत दिली. सत्तेतून बाहेर न पडण्याच्या पक्षाच्या भूमिकेचे समर्थन करताना राऊत म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात आम्ही संघर्ष केला. कारण, यांच्या हातात पुन्हा महाराष्ट्राचा कारभार द्यायचा नव्हता. त्यामुळे सरकार वाचवण्याची भूमिका आम्ही स्विकारली. जर आघाडी सरकार चांगले काम करत होते तर जनतेने त्यांना सत्तेतून खाली उतरवले नसते पण, आत्ताचे सरकार टीकावे असे आम्हाला वाटते, असे राऊत म्हणाले.