राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून एका वृत्तवाहिनीशी बोलताना अपशब्द वापरले आहेत. यावरून आता राजकीय वातावरण चांगलच तापायला सुरूवात झाली आहे. सत्तारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अब्दुल सत्तारांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घुसून तेथील काचा फोडल्या व आंदोलन सुरू केले आहे. याशिवाय सत्तारांनी सुप्रिया सुळेंची माफी मागावी अशी मागणी करत २४ तासांचा अल्टिमेटमही दिला आहे. या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.
“आम्ही अल्टिमेटम वैगरेला घाबरत नाही. जे खोके-खोके म्हणून आम्हाला बदनाम करतात, त्यांच्यासाठी ते उत्तर होतं. माझ्या शब्दांमुळे जर महिलांचे मन दुखावले असेल तर मी माझे शब्द मागे घेतो.” असं कृषीमंत्री सत्तार म्हणाले आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्तार म्हणाले, “मी पहिल्यांदाच सांगितलं आहे की, मी कोणत्याही महिला भगिनीच्याबद्दल अपशब्द वापरले नाहीत. मी जे बोलले ते आम्हाला जे लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याबद्दल बोललो आहे. सुप्रिया सुळे किंवा कोणत्याही महिलेचे मन दुखावेल असा शब्द मी बोललो नाही. जर मी बोलल्यामुळे महिला-भगिनींची मनं दुखवले असतील तर मी नक्कीच खेद व्यक्त करेन, परंतु मी असं काहीच बोलले नाही. मी जे बोललो ते केवळ खोक्यांच्या बद्दल बोललो, खोके-खोके करणाऱ्यांच्या डोक्यात परिणाम आहे, हे मी आताही बोलत आहे. परंतु त्याचा अर्थ महिलांच्याबद्दल काढला जात आहे. महिलांच्याबद्दल एक शब्दही मी बोललो नाही आणि यापुढेही बोलणार नाही. आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व आमदार महिलांचा सन्मान करतात आणि मीही महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे.”
याशिवाय “महिला कोणत्याही महिला-भगिनीबद्दल बोललो नाही आणि जे पुरुष मंडळी यावर तेल टाकण्याचं काम करत आहेत, मी कोणत्याही महिला-भगिनींची मन दुखावले असतील तर खेद व्यक्त करतोय. परंतु आम्हाला जर कोणी बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल, आमच्यावर खोक्यांचा आरोप करत असेल तर त्याबद्दल वापरलेली भाषा आहे. ही शहरातील नाहीतर ग्रामीण भागातील भाषा आहे.” असंही सत्तारांनी सांगितलं.
हेही वाचा >> अब्दुल सत्तारांना खुलं पत्र: महिलांना शिवीगाळ करण्यात कसला आलाय पुरुषार्थ ?
याचबरोबर, “कोणी काचा फोडल्या किंवा दगडं फेकले असतील तर मला त्याची भीती वाटत नाही. मी आताही सांगतोय मी महिलांचा आदर करणार कार्यकर्ता आहे. कोणाच्याबद्दलही मी अशा भावना दुखवणारे शब्द बोललो नाही. महिलांचे मन दुखावले असेल तर मी माफी मागतो.” असंही यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले.