सांगली: वक्त से पहले, और नशिब से जादा कुछ नहीं मिलता अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार अनिल बाबर यांनी रविवारी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केली.
रविवारी झालेल्या राजकीय भूकंप आणि मंत्रीमंडळ विस्तारानंतर आ. बाबर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी कधीही मंत्रीपदाची अपेक्षा ठेवलेली नव्हती. यामुळे मला मंत्रीपद मिळाले, अथवा मिळाले नाही तर लोकांच्या कल्याणासाठी कार्यरत रहाणे हा माझा स्वभावच आहे. नशिबात असेल तेव्हा आणि जेवढे नशिबात आहे तेवढेच आपणास मिळते. मोदी सरकारच्या पहिल्या टप्प्यामध्ये शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीला पाचारण करण्यात आले होते. मात्र विमानतळावरूनच त्यांना मंत्रीपदापासून परत मागे फिरावे लागले होते. यामुळे समय से पहले और नशिबसे जादा कुछ नही मिलता असेही आ. बाबर म्हणाले.
आणखी वाचा-“बंडखोर आमदारांनी माझ्याशी संपर्क साधलाय, येत्या दोन दिवसांत…”, शरद पवारांचं महत्त्वाचं विधान
येत्या आठ-दहा दिवसात मंत्रीमंडळाचा विस्तार होउन सांगली जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार बाबर यांना मंत्रीपदाची संधी मिळेल अशी चर्चा सुरू होती. आ.बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटचे सहकारी आणि जेष्ठ सदस्य असल्याने त्यांना निश्चितच मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता त्यांच्या गटासोबतच भाजपमधून व्यक्त होत होती. ताज्या घडामोडीमुळे बाबर यांच्या मंत्रीमंडळातील समावेशाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.