मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आपल्यासोबत ३० हून अधिक आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील काही उर्वरित आमदार देखील गुवाहाटीला पोहोचले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचं संख्याबळ वाढताना दिसत असून शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना आता एकनाथ शिंदे आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून हा दावा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. त्यासाठी कायदेशीर लढा देण्याची तयारी देखील सुरू असल्याचं वृत काही वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आहेत. त्यामुळे खरी शिवसेना नेमकी कोणती हा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण आपल्याला मिळावं यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत.
विधानसभा उपाध्यक्षांना पत्र सादर केल्यानंतर ते सत्तास्थापनेचा दावा करू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी शासकीय निवासस्थानातून (वर्षा बंगला) आपला मुक्काम हलवला आहे. ते ‘मातोश्री’वर राहायला गेले आहेत. राजीनामा देण्याआधीच ‘वर्षा’ बंगला सोडणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिले मुख्यमंत्री आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून बाहेर पडताना, हजारो शिवसैनिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. अनेक शिवसेना कार्यकर्त्यांना अश्रू देखील अनावर झाले होते. अत्यंत भावनिक वातावरणात त्यांनी आपला मुक्काम मातोश्रीवर हलवला आहे.