दादांचा आणि माझा शेवटचा श्वास जाईल. परंतु आमच्यात कधी भांडण होणार नाही. आम्ही ना कधी वडिलांना दिलेला बटाटावडा काढू ना सूप काढू. आम्ही सुसंस्कृत घरातील आहोत, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज आणि उद्धव यांचे नाव न घेता लगावला.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार डॉ. सतीश पाटील यांच्या प्रचारार्थ येथील बलराम व्यायामशाळेच्या मैदानावर आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या. आपण राजकारण करीत नाही. राजकारण केल्याने काय भले होणार आहे. ज्या दिवशी पैसे खर्च करून लढण्याची वेळ येईल. त्या दिवशी मी राजकारण सोडून देईन, असा निश्चयही सुप्रिया यांनी व्यक्त केला.
नऊवारी साडीवाली सहावारीवर आली. आता ती पंजाबी ड्रेसवर आली आहे. पंजाबी ड्रेसवाली आज पँट घालू लागली आहे, याकडे लक्ष वेधून हे सामाजिक परिवर्तन आहे, असे मत सुप्रिया सुळे यांनी मांडले. आज प्रत्येकाच्या घरात मोबाईल आहे. आपले राहणीमान बदलले, असेही त्या म्हणाल्या.
 इतर राज्यांमधून नेते येतात. त्यांना येथील परिस्थिती काही माहीत नसते. लोक भाषण लिहून देतात. आणि ते भाषण करतात, असा टोलाही त्यांनी हाणला. जळगाव, रावेरचे खासदार दिल्लीत बोलत नाहीत. आमचे सर्व खासदार काय बोलले, किती प्रश्न विचारले हे शरद पवार स्वत: लक्ष ठेवून असतात, असेही सुळे यांनी नमूद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We do not talk family issues in general supriya sule