राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं यावर सोमवारी निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत अजित पवार गटाच्या वकिलांनी वारंवार शरद पवारांनी हुकुमशहाप्रमाणे पक्ष चालवला. २०२२ मधील पक्षांच्या नियुक्त्या नियमबाह्य पद्धतीने केल्या, असा युक्तिवाद केला. यावर आता अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी आपली भूमिका मांडली आहे. शरद पवारांनी हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवला, असं आम्ही बोललोच नाही, असं विधान अमोल मिटकरी यांनी केलं. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवारांनी हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवला. मनमानी करत नियमबाह्य पद्धतीने नियुक्त्या केल्या, या वकिलांच्या युक्तिवादाबाबत विचारलं असता अमोल मिटकरी म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) भूमिका वकिलांकडे कळवली आहे. नीरज किशन कौल हे आमची भूमिका मांडतायेत. निवडणूक आयोगासमोर त्यांनी युक्तिवाद केला होता. त्यांनी काय युक्तिवाद करावा? हा त्यांच्या प्रक्रियेचा भाग आहे. मात्र आम्हाला जे म्हणणं मांडायचं होतं. ते आम्ही वकिलांमार्फत मांडलं आहे. त्यांनी जो युक्तिवाद केला, तो त्यांचा अधिकार आहे. पण आम्ही तसं काही बोललो नाही. शरद पवारांबद्दल आमच्या मनात नितांत आदर होता. आजही आहे आणि भविष्यातही कायम राहील.”

हेही वाचा- “…हे कायद्याचं अज्ञान आहे”, अजित पवार गटाच्या ‘त्या’ मागणीवर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान

हुकुमशहाप्रमाणे पक्ष चालवल्याचं तुम्हाला कधी जाणवलं का? असं विचारलं असता आमदार मिटकरी पुढे म्हणाले, “मी सुरुवातीपासून सांगत आलोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संविधानिक पक्ष आहे. या पक्षामध्ये कुणी हुकुमशाही पद्धतीने वागलं, असं मला तरी जाणवलं नाही. त्यामुळे हा पक्ष केवळ पक्ष नसून आम्ही त्याला परिवार म्हणतो. वकिलांचा युक्तिवाद हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. आम्ही आमची भूमिका त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने मांडली आहे.”

हेही वाचा- “अजित पवार गटाकडून जयंत पाटील मुख्यमंत्री होणार असतील, तर…”, सुप्रिया सुळेंचं विधान चर्चेत

राष्ट्रवादी पक्षातील वादावर भाष्य करताना अमोल मिटकरी म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांकडे आहे. अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे आमदारांचं संख्याबळ आहे. विधानसभा-विधानपरिषदचे आमदार, लोकसभा व राज्यसभेचे खासदार आणि नागालँडचे आमदार असं मोठं संख्याबळ अजित पवारांकडे आहे. शिवाय शपथपत्रांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासमोर आमची बाजू भक्कम असल्यामुळे निकाल आमच्या बाजुने लागेल. याबद्दल दुमत असण्याचं काहीही कारण नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We dont call dictator to sharad pawar amol mitkari statement ajit pawar faction ncp dispute rmm
Show comments